पॅरिस, वृत्तसंस्था : जागतिक टेनिस मानांकनात अव्वलस्थानी विराजमान असणारा नोव्हॅक जोकोविच यंदा अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे. दि. 11 मे पासून कोविड-19 लसीकरणाची माहिती देणे सक्तीचे असणार नाही. त्यामुळे जोकोविच या स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे. हार्डकोर्टवर खेळवली जाणारी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा यंदा 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.
कोविड-19 प्रतिबंधक लस न घेणार्या जागतिक स्तरावरील अव्वल अॅथलिटस्मध्ये जोकोविचचा समावेश होता आणि याच कारणामुळे तो गतवर्षी अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. यंदाही 35 वर्षीय जोकोविचला अमेरिकेतील इंडियन वेल्स व मियामी स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी जोकोविचने अमेरिकन प्रशासनाशी संपर्क साधत आपल्याला नियमातून सूट मिळावी, अशी विनंती केली होती. पण, अमेरिकन प्रशासनाने ती फेटाळून लावली होती.
जोकोविचला कोविड-19 प्रतिबंधक लस न घेतल्याने मागील वर्षातील ऑस्ट्रेलियन स्पर्धेला देखील मुकावे लागले आहे. त्या स्पर्धेसाठी जोकोविच ऑस्ट्रेलियात जरुर पोहोचला. पण, लस घेतल्याचे सर्टिफिकेट सादर न केल्याने त्याची तातडीने मायदेशी रवानगी करण्यात आली होती. कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्याची सक्ती केली तर आपण ग्रँडस्लॅम देखील खेळणार नाही, असे जोकोविच त्यावेळी जाहीरपणे म्हणाला होता. जोकोविचने आजवर जिंकलेल्या 22 ग्रँडस्लॅममध्ये अमेरिकन स्पर्धेतील 3 जेतेपदांचा समावेश आहे.