पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवारांचा एक दर्जा आहे, ते मोठी ताकद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यातून काहीही होणार नाही. सर्वकाही अयशस्वी होईल, असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रीय पातळीवरुन अनेक नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. रविवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवारांना पाठिंबा दिल्यानंतर आज लालू प्रसाद यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करून रविवारी (दि.२) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अजित पवार यांच्या बंडाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे.
सोनिया गांधी यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनीही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. अजित पवार यांच्या कृतीला आमचा पाठींबा नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.