जळगाव : पुढारी वृत्तसेवा
देशात तीन ठिकाणी नोटा छापल्या जातात. सरकारने काही हजार कोटी नोटा छापल्या, मात्र त्या नोटा आरबीआयला पोहोचल्याच नाही, अशी बातमी एका वृत्तपत्रात छापून आली आहे. याबाबत आरबीआयने चौकशी करून खुलासा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
अमळनेर येथे पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, काल मी एक बातमी वाचली, ती खरी आहे की खोटी याचा तपास केला पाहिजे. काही लाख किंवा काही कोटी रुपयांच्या छापलेल्या नोटा या आरबीयआयमध्ये पोहोचल्या नाहीत. 2016 मध्ये काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500, 1000 च्या नोटा बंद केल्या इथवर ठीक आहे. काळा पैसा काढण्यासाठी नोटबंदी केल्याचे सरकार सांगते. देशाच्या भल्यासाठी जे करायचे ते करा. देशाचे नागरिक म्हणून आम्ही काही गोष्टी सहन करायला तयार आहे. आम्ही हे सहनही केले, रांगेत उभे राहिलो. परंतु हे सहन केल्यानंतर पुन्हा तेच पाचशे, हजारांची नोट काढतात. पुन्हा तेच दोन हजारांची नोट बंद करतात. हे जे काही चाललेय हा पोरखेळ आहे. आता ही जी बातमी व्हायरल होत आहे त्यावर सरकारने खुलासा करावा, असेही पवार म्हणाले.