नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन दाखल करणे किंवा शिफारशीची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात दि. 1 मे 2024 पासून झाली असून अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन आणि शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जाणार आहेत.
भारतात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असुन त्यानंतर पद्म पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 1954 मध्ये देशात पद्म पुरस्कार देण्यास सुरूवात झाली. पद्म पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे तीन पुरस्कार आहेत. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केली जाते.
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील 'उत्कृष्ट कार्याच्या' सन्मानार्थ तसेच विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवेसाठी हे पुरस्कार दिले जातात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणारे आणि सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
पद्म पुरस्कारांचे रूपांतर "लोकांचे पद्म" मध्ये करण्यासाठी केंद्रसरकार प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व नागरिकांनी त्यांच्या स्व-नामांकन किंवा शिफारशी सादर करावे, असे आवाहन गृह मंत्रालयाने केले आहे. नामांकन किंवा शिफारशींमध्ये पुरस्काराच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात सांगितलेले सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त ८०० शब्द) शिफारस केलेल्या व्यक्तीची, त्यांच्या संबंधित क्षेत्रातील कामगिरी स्पष्टपणे मांडलेली असावी. या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) पुरस्कार आणि पदके' या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहे.