Loksabha Slection 2024 : शाहू महाराज यांना उमेदवारी; न्यू पॅलेसवर जल्लोष

Loksabha Slection 2024 : शाहू महाराज यांना उमेदवारी; न्यू पॅलेसवर जल्लोष
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. गुरुवारी रात्री काँग्रेसने उमेदवरांची यादी जाहीर केली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे शाहू महाराज यांचा समावेश आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच न्यू पॅलेस, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती शिवाजी चौक तसेच शहरात ठिकठिकाणी आतषबाजी करत जल्लोष केला. राजर्षी छत्रपती शाहूंचा विचार दिल्लीत पोहोचविण्यासाठी जनतेच्या आग्रहास्तव मैदानात उतरल्याची प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी व्यक्त केली. (Loksabha Slection 2024)

राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविलेले खा. धनंजय महाडिक भाजपमध्ये गेले तर शिवसेनेकडून विजयी झालेले संजय मंडलिक हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यामुळे जिल्ह्यातील राजकारण बदलले आहे. शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्यामुळे या जागेवर शिवसेनेने हक्क सांगितला होता, मात्र शाहू महाराज यांचे नाव महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आले. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी शाहू महाराज यांना द्यायची, मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची याचा निर्णय शाहू महाराज यांच्यावरच सोपविण्यात आला.

काँग्रेसकडून सुरुवातीला आ. पी. एन. पाटील, सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. बाजीराव खाडे, डॉ. चेतन नरके हेही इच्छुक होते. लोकसभेसाठी उमेदवारीचा विषय निघाला की आ. पी. एन. पाटील व आ. सतेज पाटील एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत होते. आ. सतेज पाटील यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळेल आणि याठिकाणी 'सरप्राईज' उमेदवार असेल, असे जाहीर केले. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांची दसरा चौकात सभा झाली आणि या सभेचे अध्यक्षस्थान शाहू महाराज यांनी भूषविले होते. तेव्हापासून यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू झाली.

शरद पवार यांनी कोल्हापूर दौर्‍यात शाहू महाराज यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी शाहू महाराज लोकसभेची निवडणूक लढविणार असतील तर आपणास आनंदच होईल, असे म्हटले होते. तेव्हापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज हेच उमेदवार असणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला होता. शिवसेना ठाकरे गटाने शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला हा मतदारसंघ सोडला. गुरुवारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Loksabha Slection 2024)

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराज समर्थकांनी शिवाजी चौकात व न्यू पॅलेसवर फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी शाहू महाराज यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, अर्जुन माने, अनिकेत पाटील, युवराज कुरणे, अनिकेत घोटणे, गणेश शिंदे, उदय पोवार आदी उपस्थित होते.

कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभला आहे. राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी व वेगाने विकसित होणार्‍या शहरातील तरुणांच्या टॅलेंटला वाव मिळेल, सुशिक्षितांच्या हाताला रोजगार मिळेल. शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. उद्योग-व्यवसायाला आणखी चालना देण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे शाहू महाराज म्हणाले.

कोल्हापूरची जनता सूज्ञ आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचा वारसा जपणार्‍या गादीला मान आणि मत दोन्ही देतानाच विकासाला नवा चेहरा देण्यासाठी पुढाकार घेईल याची खात्री आहे. यातून समतेचे नवे पर्व सुरू करण्याची संधी जनता निश्चितपणे साकार करेल याचा विश्वास आहे, असेही शाहू महाराज म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news