पती-पत्नीचे एकमेकांवर आरोप, अश्‍लील टिपण्‍णी; उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले,”असे लग्‍न…”

पती-पत्नीचे एकमेकांवर आरोप, अश्‍लील टिपण्‍णी; उच्‍च न्‍यायालय म्‍हणाले,”असे लग्‍न…”

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पती आणि पत्‍नी हे दोघेही एकमेकांचाअपमान करतात, एकमेकांवर अश्‍लील टिपण्‍णी करतात तेव्‍हा असे लग्‍न टिकवून ठेवण्‍यात काही अर्थ नाही, असे निरीक्षण नोंदवत नुकतेच मद्रास उच्‍च न्‍यायालयाने पतीने घटस्‍फोटाची मागणी केलेली  याचिका निकालात काढली. या संदर्भातील वृत्त 'बार अँड बेंच'ने दिले आहे.

काय होते प्रकरण?

जोडप्‍याचे नोव्‍हेंबर २०१७ मध्‍ये लग्‍न झाले. काही दिवसांमध्‍ये दोघांमधील मतभेद वाढले. पतीने क्रूरतेच्या कारणास्तव श्रीविल्लीपुथूर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्‍फोटासाठी याचिका दाखल केली.

दाम्‍पत्‍याचे एकमेकांवर आरोप, अश्‍लील टिपण्‍णी

पतीने आपल्‍या याचिकेत दावा केला होता की, पत्नीने २०२० जानेवारी ते ऑक्टोबर या कालवधीत सतत अपमानास्पद ईमेल आणि मेसेज पाठवून त्रास दिला. तसेच भारतीय दंड संहितेच्‍या 498 अ अंतर्गत पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध क्रूरतेचा गुन्हाही दाखल केला. पत्‍नीने आरोप केले की, तिचा नवरा जहाजावर काम करत असल्याने तो ६ ते ९ महिन्यांनंतरच घरी परतायचा. या काळात सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. तसेच पतीने पत्नीवर शारीरिक संबंधास नकार दिल्‍याचा आरोप केला, तर  पतीमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे आणि उपचारानंतरच ती गर्भवती होऊ शकते,  तिच्या सासू आणि वहिनींनी तिला पायऱ्यांवरून ढकलले, परिणामी तिचा गर्भपात झाला. तसेच सासरच्‍या मंडळींनी घरातून बाहेर काढले, असे आराेप  पत्नीने केला हाेता. श्रीविल्लीपुथूर कौटुंबिक न्‍यायालयाने याचिका फेटाळली. यानंतर पतीने उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली हाेती.

न्‍यायमूर्तींनी वकिलांना ईमेलमधील मजकूर वाचण्यापासून रोखले

मद्रास उच्‍च न्‍यायालयाचे न्यायमूर्ती जी जयचंद्रन आणि सी कुमारप्पन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, या प्रकरणातील पती आणि पत्‍नीने एकमेकांविरोधात वापरलेले अपमानास्पद शब्द त्‍यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी देणार नाहीत. तसेच अशा प्रकारचे वर्तनात सुधारणेचा  कोणताही वाव नाही. यावेळी न्यायालयाने पतीच्या वकिलाला न्यायालयात ईमेलमधील मजकूर वाचण्यापासून रोखले. हा मजकूर सार्वजनिकरित्या वाचण्यास योग्य नाही, असे न्‍यायालयाने सांगितले.

अशा प्रकारचे लग्‍न  टिकवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही

23 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात मद्रास उच्‍च न्‍यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणातील पती आणि पत्‍नी सुशिक्षित आहेत. विवाह टिकवावा, अशी त्‍यांची इच्‍छा असतील तर हे नाते टिकलेही असते. मात्र दोघांनीही (ईमेल आणि मेसेजद्वारे) केलेल्या अपमानास्पद शब्दांचा वापर केला. या नात्‍यात दोघांनीही समान क्रौर्य केले. गेली पाच वर्ष दोघेही विभक्‍त राहत आहेत, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे योग्‍य ठरणार नाही. दोघांनीही वयाची ३५ वर्षे ओलांडली आहे. त्‍यामुळे आता वैवाहिक स्थितीबद्दल निश्चित होत नाहीत तोपर्यंत त्यांचे भविष्य निश्चित करणे कठीण होईल. कोणत्याही विलंबामुळे मतभेद आणि तेढ आणखी वाढू शकते, असे स्‍पष्‍ट करत पती-पत्नी दोघेही शाब्दिक भांडण, शिवीगाळ आणि एकमेकांवर अश्लील टीका करत राहतात तेव्‍हा असे लग्‍न संबंध टिकवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे स्‍पष्‍ट करत घटस्‍फोटाला मंजुरी देत ही याचिका निकाली काढली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news