संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेरमधील जोर्वे रोडवर घडलेल्या या घटनेला काही जणांकडून वेगळा रंग देण्याचाही प्रयत्न सुरु आहे. मात्र या घटनेची पोलिसांनी गंभीर स्वरूपात दखल घेतली असून दोषी असलेल्यां गुन्हेगारांना कोणत्याही परीस्थितीत सोडणार नाही, अशी तंबी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या जोर्वेतील ८ तरुणांना जोर्वेनाका येथील 100 तरुणांच्या जमावाने धारदार हत्यारांनी वार करत मारहाण केली. त्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री विखे पाटील यांनी संगमनेरात येऊन जोर्वे नाका येथील घटनेची माहिती घेतली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जोर्वे नाकाची घटना काही समाजकंटकांनी घडवून आणलेली आहे. त्यातून शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दोन समाजात तेढ निर्माण करुन काहीही साध्य होत नसते. यासारख्या घटनांमधून सर्वसामान्य माणसांचेच नुकसान होत, हे समजून घेण्याची गरज आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही. ज्यांनी हा प्रकार घडवला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतच्या कडक सूचना आपण पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.
जोर्वेनाका परिसरात बोकाळलेले अतिक्रमण आणि त्यात झालेला अवैध धंद्यांचा सुळसुळाट या गोष्टी या घटनेला कारणीभूत ठरल्या असल्याचाही गंभीर आरोप महसूलमंत्री विखे पाटील यांनी केला. शहराचे सौहार्द नष्ट करणार्या अशा अतिक्रमणांवर नगरपालिकेने वेळोवेळी कारवाई करणे अपेक्षीत असताना संगमनेरात मात्र, तसे होत नसल्याचा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. जोर्वेनाका परिसरातील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या सूचना नगरपालिकेला देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
संगमनेरमध्ये वाळू तस्करांकडून मुदत संपलेल्या व कालबाह्य झालेल्या वाहनांचा वापर गंभीर असल्याचे सांगत मंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांसमोरच प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करुन संमनेरातील सर्व रिक्षा व अन्य वाहनांची कागदपत्रे तपासण्याबाबतच्या सूचना विखे यांनी दिल्या आहेत.
राज्यात वाळूचे धोरण जाहीर झाल्यानंतर बेकायदा वाळू उपसा बंद व्हावा यासाठी ठोस उपाययोजना सुरु आहेत. वाळू तस्करांची ओळख पटवण्यासाठी यापुढे ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यातूनच वाळू तस्करांची ओळख पटवून त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत महसूल प्रशासनाला सूचना दिल्याचे विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.