चुकीला माफी नाही : उध्दव ठाकरे

चुकीला माफी नाही : उध्दव ठाकरे
Published on
Updated on

कोपरगाव/संगमनेर: पुढारी वृत्तसेवा :  चुकीला माफी असते, पण गुन्ह्याला नसते. सेनेच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करणारा येथील गद्दार खासदाराने शिवसेना फोडणार्‍यात सामील होण्याचा गुन्हा केलाय. त्यामुळे त्यांच्या चुकीला माफी नाही, अशा शब्दात उबाठा सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. आता तर लोखंडेंना उमेदवारीच मिळणार नसल्याचा दावाही ठाकरे यांनी केला. संवाद मेळाव्याच्या निमित्ताने उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, अकोले येथे खा.लोखंडे यांच्यासोबतच भाजपवर घणाघात केला.

ठाकरे म्हणाले, शिवसेनेसोबत अनेकांनी गद्दारी केली, तरीही भगवा फडकत राहिला. संकट येत, पण ज्याच्या हृदयात भगवा आहे, ते संकटाला घाबरत नाहीत. खासदार स्वत:च गद्दार झाला, त्यांना निवडून देणारे निष्ठावंत मात्र माझ्यासोबत राहिले. खासदाराला गतवेळीच निवडून येणे कठिण होतं. शिवसैनिकांच्या मनात ते नव्हते. सेनेचे लेबल लागले म्हणून श्रध्देपायी एकदा नव्हे तर दोनदा सेनेचा उमेदवार म्हणून जबरदस्तीने काम करून त्यांना निवडून द्यावं लागलं. आता ते स्वत:हून गेले आहे. तुमची निशाणी धनुष्यबाण नसून, कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का हीच आहे. धनुष्यबाण त्यांनी पेलून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही. भाजपनेही त्यांना उमेदवारी देवून दाखवावी, असे आवाहन ठाकरे यांनी भाजपला दिले.

भाऊसाहेब वाकचौरेही पक्ष सोडून गेले होते, पण परत आले. त्यांनी शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला नाही. पण लोखंडे यांनी शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केला. सेना आमची आहे. येथील गर्दीवरून ते दिसते. चोरांच्या हातात शिवसेना देता, त्यात येथील गद्दार सामील होतो, हा कलंक असून भगव्याला छेद देण्याचा गुन्हा त्यांनी केला असल्याने गुन्ह्याला माफी नाही, आता त्यांना गाडलेच पाहिजे, अशा शब्दात ठाकरे यांनी ठणकावले. निळवंडे धरणाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही पैसे दिले, आणि हे टिकोजीराव आम्ही काम केलं, असे म्हणत श्रेय घ्यायला येत असल्याचा टोेला ठाकरे यांनी मारला.

कोपरगावला आठ दिवसात एकदा पाणी मिळते. पाण्याचा हा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून मविआ सरकार असताना 121 कोटी रुपये निधी दिला. ते काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचे श्रेय घ्यायलाही पंतप्रधान मोदी येतील असा उपहासात्मक टोलाही ठाकरे यांनी लगावला. 'मी उध्दव ठाकरे' लिहिलेल्या टोप्या पाहून ठाकरे म्हणाले, सगळ्या बाजुने घेरले, पण उध्दव ठाकरेंना संपवता येत नाही, हेच भाजपला कळत नसल्याचे ते म्हणाले. कोपरगावच्या सभेला जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, संजय सातभाई, ऐश्वर्या सातभाई, कैलास जाधव, भरत मोरे, सपना मोरे, संदीप वर्पे, आकाश नागरे, असलम शेख, श्रीराम चांदगुडे, प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे तर संगमनेरच्या सभेला दिलीप साळगट, शहर प्रमुख आप्पासाहेब केसेकर, विधानसभा संघटक कैलास वाकचौरे, उपशहर प्रमुख पप्पू कानकाट, अमर कतारी, महिला आघाडी प्रमुख शितल हासे, अमित चव्हाण उपस्थित होते.

आता ना काळे, ना कोल्हे, यावेळी फक्त सेनेचा वाघ
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कोपरगावला आठ दिवसांतून मिळणार्‍या पाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताना येथील सम्राट समजले जाणारे नेते कोपरगावच्या जनतेला शुद्ध पाणी देऊ शकत नाही, तर तुमची सत्ता काय कामाची असे टीकास्त्र सोडत 'ना काळे, ना कोल्हे यावेळी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फक्त सेनेचा वाघच निवडून आणू' असे आवाहन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news