नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर महापालिकेतर्फे नाशिक शहरात २५ ठिकाणी 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ही योजना राबविली जाणार असून, या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरानजीक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'मोहल्ला क्लिनिक'च्या धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईसह राज्यभरात 'स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ७०० दवाखाने सुरू केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला या योजनेचा शुभारंभ केला गेला. मुंबईत आतापर्यंत सुमारे ७२ ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्यात आला आहे. ठाण्यातही ही योजना राबविण्यात येत आहे. पाठोपाठ आता नाशिककरांनादेखील 'आपला दवाखान्या'ची सेवा उपलब्ध होणार आहे. शहरात २५ ठिकाणी आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी दवाखाने सुरू केले जाणार आहेत. ताप, सर्दी अशा छोट्या-मोठ्या आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय तपासण्यांकरिता घरापासून दूर अंतरावर असलेले रुग्णालय गाठावे लागते. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो. दुसऱ्या बाजूला दैनंदिन रुग्णांमुळे बड्या शासकीय रुग्णालयांवरील ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभाग अशा तत्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. यावर उपाय म्हणून २५ ते ३० हजार वस्तीनजीक 'आपला दवाखाना' सुरू करण्याची योजना आहे.
विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळणार
या योजनेअंतर्गत साधारणपणे २५ हजार ते ३० हजार लोकसंख्येसाठी १ आपला दवाखाना सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत हे दवाखाने सुरू राहतील. या दवाखान्यांमध्ये विनामू्ल्य वैद्यकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मासिस्ट आणि एक बहुउद्देशीय सेवक आणि एक सुरक्षारक्षक अशा पाच जणांची टीम कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे.
भाडेतत्त्वावर घेणार जागा
आपला दवाखान्याची जागा महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. या दवाखान्यासाठी सुमारे एक हजार चौरस फूट बांधीव जागेची आवश्यकता आहे. त्यात वेटिंग रूम, डॉक्टर रूम, फार्मासिस्ट रूम, नर्सिंग रूम तसेच स्वच्छतागृह या सुविधा असणे आवश्यक असणार आहे. या जागेपोटी शासनाने एक लाख रुपयांपर्यंत भाडे देण्याचे निश्चित केले आहे. त्यात सफाई कर्मचारी व सुरक्षारक्षकाची सोय जागा मालकाला करून द्यावी लागणार आहे. या योजनेसाठी महापालिकेकडे १४ प्रस्ताव दाखल झाले असून, या प्रस्तावांची सध्या छाननी सुरू आहे.