नितीन गडकरी : सांगली, सातारा जिल्ह्यात ३० हजार कोटींचा १० पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार

नितीन गडकरी : सांगली, सातारा जिल्ह्यात ३० हजार कोटींचा १० पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार

विटा ; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी म्हणून सांगली, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जाणारा ३० हजार कोटींचा १० पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार आहोत अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्ग वाहतूक मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

भिवघाट (ता.खानापूर) येथे आज शनिवारी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख,विलासराव जगताप, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे,अमरसिंह देशमुख, राहुल गुरव, शंकरराव मोहिते, नीता केळकर आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ना. गडकरी म्हणाले, एकीकडे महापूर दुसरीकडे दुष्काळ हे चित्र बदलण्याची भूमिका घेऊन आम्ही मागील पाच वर्षात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्य सरकारच्या बळी राजा सिंचन योजनेच्या माध्यमातून टेंभू योजने ला जवळपास १ हजार ३०० कोटी रुपये निधी दिला. याचा फायदा ४०० गावांना होताना एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. असे गडकरी म्हणाले.

चांगले बियाणे, खते मिळत असले तरी शेत मालाचा भाव मिळत नाही. यासाठी प्रक्रिया उद्योग उभारणे गरजेचे आहे. सांगली भागातील शेतकऱ्यांचा माल जगात कुठेही निर्यात होण्यासाठी सांगलीत ड्राय पोर्ट उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पावले उचलणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्या उभारून स्वतः निर्यात क्षेत्रात उतरले तर डॉलरमध्ये परकीय चलन मिळून शेतकरी मोठा होण्यास मदत होईल. असे नितीन गडकरी म्हणाले.

साखर कारखान्यांनी साखर उत्पादन ऐवजी इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिले पाहिजे. येत्या काळात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या रस्त्यावर दिसतील. सध्या पेट्रोल मध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जाते, लवकरच २०टक्के मिसळण्याचा निर्णय घेत आहोत.

शाश्वत विकासासाठी सांगली,सातारा जिल्ह्याच्या खटाव, खानापूर, तासगाव आदी ग्रामीण भागातून जाणारा ३० हजार कोटींचा १० पदरी राष्ट्रीय महामार्ग उभारणार आहोत. शेतकऱ्यांनी आता केवळ अन्नदाता बनण्यापेक्षा ऊर्जा दाता बनावे असे आवाहनही मंत्री गडकरी यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news