सोलापूर : संजय पाठक : प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी जीवन संपवल्याने पंढरीच्या विठुरायाच्या तमाम भक्तांची एक इच्छा अपुरीच राहिली. देसाई यांनी तीर्थक्षेत्र पंढरीच्या चंद्रभागा तीरावरील शेगाव दुमालाच्या परिसरात विठुरायाची तब्बल शंभर फुटी मूर्ती उभी करण्याचे स्वप्न पाहिले होते. गर्दीमुळे ज्यांना मंदिरात दर्शनासाठी जाता येत नाही अशांनाही दर्शन व्हावे अन वारी पोहोच केल्याचे समाधान मिळावे, असे देसाईंचे स्वप्न होते. परंतु, ते स्वप्न आता स्वप्नच बनून राहिले आहे.
नितीन देसाई यांच्या एक्झिटने तमाम विठुरायाच्या भक्तांना धक्का बसला आहे. देसाई हे विठ्ठल भक्त होते. नेहमीच काही तरी भव्यदिव्य करण्याच्या स्वभावानुसार त्यांनी तेव्हा अशी खूप उंच विठ्ठलाची मूर्ती उभी करण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांना बोलून दाखवले होते. मात्र, आता त्यांच्या या अकाली मृत्यूमुळे हे स्वप्न अधुरेच राहिले. दरम्यान, याविषयी सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा मुंबईचे विद्यमान जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नितीन देसाई यांचे व माझे चांगले असोसिएट झाले होते. मी सोलापूरला जिल्हाधिकारी असताना पंढरपूर, अक्कलकोट व तुळजापूर दर्शनासाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी अशा पद्धतीने विठुरायाची उंच मूर्ती शेगाव दुमाला येथे उभी करण्याचे स्वप्न मला बोलून दाखवले होते. विठ्ठल मंदिराजवळ उभ्या भाविकाला नदीच्या पैलतीरावरील ती विठ्ठलाची उंच मूर्ती दिसावी, तसेच खूप दूर दूर अंतरावरूनही भक्ताला विठ्ठलाचे दर्शन व्हावे, असे त्यांचे स्वप्न होते. परंतु, आता ते अधुरेच राहिले आहे.
पंढरीच्या वारीसाठी देशभरातून लाखो भाविक तीर्थक्षेत्र पंढरीत येतात. परंतु, त्या सर्वांनाच गर्दीमुळे मंदिर परिसरात येता येत नाही. श्री विठ्ठलाचे पदस्पर्श, मुखदर्शन होत नाही. कळसाचे दर्शनही गर्दीमुळे अनेकदा दुरापास्त होते. अशा सर्व भाविकांना चंद्रभागा नदीत स्नान करत करतच विठ्ठलाचे अगदी दुरूनही दर्शन करता यावे, असे नितीन देसाई यांचे स्वप्न होते.