एच ३ एन २ इन्फ्लुएन्झा विषाणूबाबत आज नीती आयोगाची बैठक; सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश

एच ३ एन २ इन्फ्लुएन्झा विषाणूबाबत आज नीती आयोगाची बैठक; सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झामुळे (विषाणुज्वर) हरियाणा आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूमुळे मृत्यू ओढविल्याचे प्रकार पहिल्यांदाच समोर आले आहेत. दोन महिन्यांपासून देशभरात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश जारी केले आहेत. शनिवारी यासंदर्भात नीती आयोगाची बैठक होणार आहे.

हरियाणातील रुग्णाबाबत अद्याप संपूर्ण तपशील हाती आलेला नाही; मात्र कर्नाटकमधील रुग्णाबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. हिरा गौडा (वय 82) असे मृताचे नाव असून, ते 1 मार्च रोजी मरण पावले. मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रासही त्यांना होता. तपासणीदरम्यान घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल 6 मार्च रोजी प्राप्त झाला. त्यानुसार हिरा यांना एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झाची लागण झाली होती, ही बाब समोर आली.
67 दिवसांनंतर कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्याही पहिल्यांदाच 3 हजारांवर गेली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात एच 3 एन 2 विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य विभागाचा ताण वाढविणारी आहे. एच 3 एन 2ची लागण झालेले 90 रुग्ण आजवर देशभरात नोंदविले गेले आहेत. प्रत्यक्षात ही संख्या किती तरी जास्त असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी एच 3 एन 2 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात तातडीची बैठक बोलावली. बैठकीनंतर सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत एच 3 एन 2 तसेच मौसमी इन्फ्लुएन्झाबाबत धोरण ठरवले जाईल.

एच 3 एन 2 विषाणू म्हणजे काय?

सिव्हिअर क्यूट रेस्पेरिटरी इन्फेक्शनने पीडित निम्म्यावर रुग्णांमध्ये एच 3 एन 2 विषाणू आढळत असल्याचे दस्तुरखुद्द भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटलेले आहे.

एच 3 एन 2 विषाणूला एन्फ्लुएन्झा ए विषाणू म्हणूनही ओळखले जाते. खरे तर एच 3 एन 2 हा एन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा उपप्रकार आहे.

1968 मध्ये पहिल्यांदा त्याचा शोध वैद्यकशास्त्राला लागला. विशेषत:, वातावरणातील बदलाच्या काळात श्वसन यंत्रणेशी निगडित व्हायरल इन्फेक्शनला तो दरवर्षी कारणीभूत ठरतो.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, या विषाणूच्या इन्फेक्शननंतर तीन आठवडे खोकला जात नाही. रक्त नमुन्यांसह काही अन्य तपासण्यांअंतीच एच 3 एच 2 ची लागण झाल्याचे कळू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news