पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे वयाच्या ५० व्या वर्षी निधन झाले आहे. 'अनुपमा' या शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारली. या भूमिकेने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात सर्वांनाच धक्का बसला आहे. (Nitesh Pandey Death) जाणून घेवूया नितेश पांडे यांच्या भूमिकांबद्दल
मनोरंजन विश्वाने गेल्या दोन दिवसांत तीन प्रतिभावान कलाकार गमावले आहेत. आदित्य सिंग राजपूत आणि वैभवी उपाध्याय यांच्या निधनानंतर आता अभिनेता नितेश पांडे यांचे निधन झाले आहे. नितेश पांडे हे चर्चेतील आणि नंबर वन शो असलेल्या 'अनुपमा' मध्ये अनुजचा चांगला मित्र धीरजच्या भूमिका करत होते. अभिनेत्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
ई टाईम्सच्या वृत्तानूसार नितेश यांना नाशिकजवळील इगतपुरी येथे हृदयविकाराचा झटका आला. जिथे ते काल रात्री शूटिंग करत होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या वृत्ताला नितेशच्या जवळचे निर्माता सिद्धार्थ नागर यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले," नितेश यांचे वडील त्यांचे पार्थिव घेण्यासाठी इगतपुरीला रवाना झाले आहेत. आज दुपारपर्यंत ते इथे येतील. आम्ही ही बातमी ऐकून पूर्ण सुन्न झालो, अपघातानंतर मी अर्पिताशी (सिद्धार्थ नागर यांची मेहूणी आणि नितेश यांची पत्नी) बोलू शकलो नाही.
नितेश पांडे यांनी आपल्या २५ वर्षांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाचा विचार करता त्यांनी आतापर्यंत विवीध भूमिका साकारल्या आहेत. ते टीव्ही आणि फिल्म्समधील नावाजलेल व्यक्तिमत्व होते. ९० च्या दशकात त्यांनी थिएटर ते सिनेमा असा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी तेजस नावाच्या अल्पायुषी टीव्ही शोमध्ये गुप्तहेराची भूमिका साकारली. तर नितेश पांडे, अस्तित्व… एक प्रेम कहानी, मंजिलें अपनी, साया, दुर्गेश नंदिनी आणि जस्टजू सारख्या मालिकांमध्ये हटके भूमिका साकारल्या. याशिवाय, ते अलीकडेच 'अनुपमा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेत अभिनय करत होते. यामध्ये त्याने अनुज कपाडियाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.
रुपेरी पडद्याबद्दल बोलायचे झाले तर नितेश पांडे यांनी बधाई दो, शादी के साइड इफेक्ट्स आणि रंगून सारख्या चित्रपटात काम केले होते. तर तो शाहरुख खानसोबत ओम शांती ओम या बहुचर्चित चित्रपटात दिसला होता.
हेही वाचा