इसिस कनेक्शन : एनआयएचे 44 ठिकाणी छापे; 15 जेरबंद

इसिस कनेक्शन : एनआयएचे 44 ठिकाणी छापे; 15 जेरबंद

भिवंडी/ ठाणे, पुढारी वृत्तसेवा : 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) या जहाल दहशतवादी संघटनेशी संबंधित महाराष्ट्र-पुणे मॉड्यूलचा पर्दाफाश करत दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी पुन्हा एकदा ठाणे, पुण्यासह 43 ठिकाणी आणि कर्नाटकच्या बंगळूरमधील एका ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत एनआयएने 'इसिस'च्या पुणे मॉड्यूलच्या प्रमुखासह 15 संशयितांना अटक केली असून त्यांची झाडाझडती सुरू आहे. यातील काही जणांकडून अयोध्येत 22 जानेवारीला होत असलेल्या श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी घातपाताचा कट रचला जात होता. तो उधळण्यात आल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली.

छापेमारीदरम्यान एनआयएने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड, बंदूक, धारदार शस्त्रे, कागदपत्रे, स्मार्ट फोन आणि अन्य डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

शनिवारी कर्नाटकातील 1, पुण्यात 2, ठाणे ग्रामीणमध्ये 31, ठाणे शहरात 9 आणि भाईंदरमध्ये 1 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. अचानकपणे एनआयएची पथके भिवंडीतील पडघा भागातील बोरिवली येथे दाखल झाली आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. भिवंडी शहरातील तीन बत्ती, शांतीनगर आणि निजामपुरा जवळील इस्लामपुरा येथे एनआयएच्या पथकाने काही संशयितांच्या घरांची झडती घेतली.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी झाली होती साकिब नाचनला अटक

या कारवाईमुळे भिवंडी तालुक्यातील अतिसंवेदनशील पडघा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी पडघा भागातून मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात साकिब नाचन याला अटक झाली होती. त्यानंतर पडघा गाव तपास यंत्रणांच्या रडारवर आले होते. एनआयए, दहशतवादी विरोधी पथकांसह विविध तपास यंत्रणांनी त्यानंतर पडघावर लक्ष केंद्रित आहे.

महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 15 लोकांना पडघामधून ताब्यात घेतले आहे. या सर्वांना दिल्ली येथे घेऊन जाणार असून एएनआय प्रकरणातील न्यायालयात या सर्वांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघा-बोरिवली येथे कारवाई करण्यात आली. तेथील गावातून चार जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, तीनबत्ती, शांतीनगर व इस्लामपुरा या भागातून तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते.

एनआयएने केलेल्या तपासात अटक आरोपी हे त्यांच्या विदेशातील हँडलरच्या निर्देशानुसार कार्यरत होते. 'इसिस'चा हिंसक आणि विध्वंसक अजेंडा पुढे नेण्यासाठी आयईडी बनविण्यासह विविध दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. या मॉड्यूलचे सर्व सदस्य, पडघा-बोरिवली येथून कार्यरत होते. येथे त्यांनी संपूर्ण भारतात दहशत पसरवण्याचा आणि हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला होता.

हिंसक जिहाद, खिलाफत, इसिस अशा मार्गाचा अवलंब करून आरोपी हे देशातील शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या तयारीत होते. यासाठी आरोपींनी पडघा हे गाव 'मुक्त क्षेत्र' आणि 'अल शाम' म्हणून घोषित केल्याचीही धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. पडघा तळ मजबूत करण्यासाठी ते प्रभावी मुस्लिम तरुणांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून पडघा येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते.

इसीस महाराष्ट्र-पुणे मॉड्यूलचा प्रमुख असलेला नेता साकिब नाचन हा प्रतिबंधित संघटनेत सामील झालेल्या सदस्यांना 'बायथ' (इसिसच्या खलिफाशी निष्ठेची शपथ) देखील देत असल्याचे उघड झाले आहे.

पुण्यातील 'इसिस'च्या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात एनआयएने मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान ऊर्फ मटका ऊर्फ आमिर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी ऊर्फ आदिल ऊर्फ आदिल सलीम खान, कदीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कदीर, सीमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लालाभाई ऊर्फ लाला ऊर्फ सैफ, शमील साकिब नाचन आणि आकिफ अतीक नाचन या सात जणांविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक (यूएपीए) कायद्यासह स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा आणि भादंवि कायद्याच्या विविध कलमांखाली मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

एनआयएने या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी देशात 'इसिस'ची विचारधारा रुजवण्याचा डाव या अतिरेक्यांनी आखला होता. पुण्यातील कोंढवा परिसरातून हे नेटवर्क चालत होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि अन्य राज्यांमध्ये या संघटनेने आपली पाळेमुळे रुजवली होती. आरोपी हे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे, निधी गोळा, दहशतवाद्यांना आश्रय देणे, यासोबतच स्फोटक उपकरणे (आईडी) तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन अशी उपकरणे तयार करून त्यांचे परिक्षणसुद्धा केल्याचे पुरावे एनआयएला सापडले आहेत.

'इसिस' ही एक जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल), दैश, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (आयएसकेपी), इसिस विलायत खोरासान, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (इसिस-के) देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर इसिस मॉड्यूल आणि सेल तयार करून भारतात आपले दहशतवादी नेटवर्क पसरवत असल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

काय आहे पडघा कनेक्शन

'सिमी' या संघटनेची संबंधित तसेच मुंबईत 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सामील असलेला साकिब नाचन याला पडघामधील त्याच्या बोरिवली गावातून अटक झाली होती. त्याच्या अटकेदरम्यान काही ग्रामस्थांनी पोलिसांना अडविण्याचा आणि हल्ल्याचा प्रकार झाला होता. साकिब याची 2017 मध्ये सुटका झाली. काही महिन्यांपूर्वीच एनआयएने नाचनला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा पडघा चर्चेत आलेे. त्यानंतर एनआयएने पडघ्यात पुन्हा कारवाई सुरू केली होती. काही महिन्यांपूर्वीच पडघा भागातून एनआयएने शार्जिल शेख आणि झुल्फिकार बडोदावाला या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मदत करणार्‍या अकिबलाही याच भागातून ताब्यात घेतले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news