Rameshwaram Cafe Blast Case : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर! NIAची मोठी घोषणा; छायाचित्र केले प्रसिद्ध

Rameshwaram Cafe Blast Case : आरोपीवर 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर! NIAची मोठी घोषणा; छायाचित्र केले प्रसिद्ध
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rameshwaram Cafe Blast Case : बंगळूरच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने हल्लेखोराची माहिती देणाऱ्यास 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. हल्लेखोराची माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल. पूर्व बंगळूरच्या ब्रुकफील्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये 1 मार्च रोजी झालेल्या स्फोटात किमान 10 जण जखमी झाले होते. या स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला एक माणूस या प्रकरणात मुख्य संशयित असून त्याचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात आहे.

कॅफेमध्ये 1 मार्च रोजी स्फोट झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. यात एक व्यक्तीने रवा इडली मागवल्याचे दिसून येते. यानंतर त्याने आपली बॅग काउंटरजवळ ठेवली आणि ऑर्डर न घेता तो निघून गेला. कॅफेच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्यक्ती वेगाने धावताना दिसत आहे. फुटेजमध्ये त्या व्यक्तीने टोपी घातली असून त्याच्या हातात बॅग असल्याचे दिसून आले. त्याने मास्क आणि चष्माही घातला होता. या घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आल्यानंतर तपास यंत्रणेने आरोपीचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्याच्याबद्दल माहिती देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी एखाद्याला माहिती द्यायची असल्याने त्यांनी 080-29510900 आणि 8904241100 या क्रमांकावर किंवा info.blr.nia@gov.in यावर इ-मेलवर संपर्क साधावा असे परिपत्रकात म्हटले आहे.

या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे शाखा आणि एनआयए दोन्ही तपासात गुंतले आहेत. मंगळवारी गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय एजन्सीकडे सोपवला नव्हता. याप्रकरणी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी शहर पोलीस काटेकोरपणे आणि वेगाने तपास करत असल्याचे सांगितले. स्फोटानंतर रामेश्वरम कॅफे बंद असून आता ते 8 मार्चलाच उघडणार आहे.

1 मार्च रोजी दुपारच्या वेळेस रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात 10 जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या तासाभरापूर्वी एक तरुण कॅफेमध्ये आल्याचे समोर आले. तो तेथे काही मिनिटे थांबला आणि नंतर एक बॅग मागे ठेवून निघून गेला. ज्या बॅगेत टायमर लावला होता त्या बॅगेत आयईडी असल्याचे समजते. आरोपीने कॅफेमध्ये इडली प्लेट ऑर्डर केली होती, पण आपली ऑर्डर घेण्यापूर्वीच तो तिथून निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news