स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चार वर्षांच्या आतच पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा भरवण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आणि 1951 मध्ये दिल्लीत या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या संकल्पनेला मूर्त रूप मिळवून देण्याचे काम प्रा. गुरुदत्त सोंधी या एका भारतीयानेच केले होते. त्यामुळे आशिया खंडातील देशांमध्ये खेळांना चालना मिळू लागली. स्वतंत्र भारताच्या इतिहासात वैयक्तिक खेळात पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा पराक्रम महाराष्ट्राचे मल्ल खाशाबा जाधव यांनी केला. 1952 मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीतील फ्री स्टाईल प्रकारात त्यांनी कांस्यपदक मिळवले.
1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्येही त्यांनी भाग घेतला; पण त्यावेळी त्यांना पदक मिळाले नव्हते. मुख्य म्हणजे हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये फ्री स्टाईल प्रकारात मनोरंजन दास, श्रीरंग जाधव व जयकृष्ण माणगावे यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर सारी मदार खाशाबांवर होती. वास्तविक, त्या अगोदर झालेल्या दोन लढतींतील निकाल देताना पंचांनी पक्षपात केला. भारतीय संघाच्या व्यवस्थापकांवर हलगर्जीपणाचेही आरोप तेव्हा झाले. त्यामुळेच खाशाबांना दुसर्या फेरीत हार पत्करावी लागली. त्यावेळी 'बीबीसी'ने घेतलेल्या मुलाखतीत खाशाबांनी यासंदर्भात सडेतोड टीका केली होती. शेवटी कोणत्याही क्रीडा संघाचे व संघटनेचे व्यवस्थापन ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. परंतु, भारतात वेगवेगळ्या क्रीडा संघटनांमध्ये प्रचंड राजकारण चालते आणि त्यामुळे धनदांडग्या व राजकीय प्रवृत्ती शिरजोर होतात. कुस्तीच्या क्षेत्राचाही याला अपवाद नसून, त्यामुळे भारतीय कुस्तीगिरांवर अन्यायही होत असतो.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा व गैरव्यवहाराचा आरोप होता. त्याविरुद्ध दिल्लीत कुस्तीपटूंनी अभूतपूर्व आंदोलन केले आणि हे प्रकरण देशभर गाजले. गेल्या डिसेंबरात झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली होती. संजय हे ब्रृजभूषण सिंह यांचे निष्ठावंत सहकारी असून, 'डब्ल्यूएफआय'च्या कार्यकारिणीवरही त्यांनी काम केले होते. उत्तर प्रदेशच्या कुस्ती संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. ब्रृजभूषण यांनी आपल्या हकालपट्टीची चिन्हे दिसताच स्वतःचे प्यादे तिथे घुसवले. अध्यक्षपदी निवड होताच संजय सिंह यांनी राष्ट्रीय स्पर्धांची घोषणा अत्यंत घाईघाईत केली. त्यासाठी योग्य प्रक्रिया पार पाडण्यात आली नाही, असा आरोप केंद्रीय क्रीडा खात्यानेच केला.
ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली होती. त्याचबरोबर त्यांच्यासह त्यांच्या जवळच्या एकाही व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार देऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती, तरीही संजय सिंह अध्यक्ष झाले, तेव्हा साक्षीने निवृत्तीची घोषणा केली आणि बजरंगने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला. संलग्न राज्य संघटनांनी केलेल्या न्यायालयीन याचिकेत सहावेळा ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. वेळेत निवडणूक न झाल्यामुळे संयुक्त कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती.
या निलंबनाच्या कारवाईमुळे भारतीय कुस्तीगिरांचे विशेषतः कनिष्ठ गटातील मल्लांचे अधिक नुकसान झाले. आधी कोरोनानंतर आंदोलन आणि मग न्यायालयीन लढाया यामुळे सुमारे तीन वर्षे कुमार गटातील मल्ल अधिकृत स्पर्धांत खेळू शकले नाहीत. परिणामी, त्यांना अनुभवाशिवाय पुढील गटात जावे लागले; मात्र भारतीय क्रीडा मंत्रालयाने डिसेंबर महिन्याच्याच उत्तरार्धात नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त करून टाकला. कुस्तीपटूंना पुरेशी सूचना न देता निवडणूक घेतल्याबद्दल आणि 'डब्ल्यूएफआय'च्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. अर्थात, प्रत्यक्षात ब्रृजभूषण सिंह यांचेच वर्चस्व राहणार असल्यामुळे कुस्तीपटूंमध्ये संताप होता, हे खरे कारण असावे.
आता मात्र भारतीय कुस्ती महासंघातील परिस्थिती सुधारत असल्याचे पुरावे सादर झाल्यामुळे जागतिक संघटनेच्या शिस्तपालन समितीने 'डब्ल्यूएफआय'वरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. काही शर्तींसह ही बंदी उठवण्यात आली असून, 1 जुलैपूर्वी खेळाडू आयोगाच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. आयोगाच्या निवडणुकीत केवळ या क्षेत्रात सक्रिय किंवा माजी कुस्तीगीर सहभागी असतील, निवृत्ती घेतलेल्या कुस्तीगिराचा कालावधी चार वर्षांपेक्षा अधिक नसावा आणि या निवडणुकीसाठी केवळ पैलवानच मतदान करतील, अशा अटी घालण्यात आल्या.
अनेक वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पैलवानांनी यात ढवळाढवळ करू नये, हा यामागचा हेतू आहे, असे दिसते. त्याचबरोबर 'डब्ल्यूएफआय'ला सर्व स्पर्धांमध्ये कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व कुस्तीगिरांना सहभागी करून घेण्यात येईल, अशी हमीही जागतिक संघटनेकडे सादर करावी लागणार आहे. ही अट घालताना 'डब्ल्यूएफआय'मध्ये खेळाडूंच्या सहभागात भेदभाव केला जात असल्याचा आरोप करणार्या विनेश, साक्षी व बजरंग यांचे निषेधपत्र जोडण्यात आले आहे. एकप्रकारे आतापर्यंत केल्या जाणार्या पक्षपाताबाबत संघटनेने लगावलेली ही चपराकच आहे. या निर्णयामुळे आता भारतीय मल्ल यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली खेळू शकणार आहेत, हे महत्त्वाचे! निलंबनाच्या कालावधीत ते जागतिक संघटनेच्या ध्वजाखाली खेळत होते.
आता 'यूडब्ल्यूडब्ल्यू'ने जी बंदी घातली होती, ती उठवण्यासाठी संजय सिंह यांनी भ्रष्ट मार्ग अवलंबल्याचा आरोप बजरंग आणि साक्षीने केला आहे. जागतिक पातळीवर नेतृत्व करताना भारतीय ध्वजाखाली खेळायला मिळणे हा एक विशेष मान मानला जातो. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघावरील मागे घेतलेली निलंबनाची कारवाई ही कुस्तीगिरांना मिळालेला दिलासाच आहे. तसेच या निर्णयामुळे पैलवान नव्या जोमाने सरावाला सुरुवात करतील आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होण्याची त्यांना संधी मिळेल. जागतिक महासंघाने उठवलेली ही तात्पुरती बंदी असून क्रीडा मंत्रालय आणि देशातील विविध क्रीडा संघटनांतील वाद मिटवणे गरजेचे आहे. भविष्यात भारतीय कुस्तीचे आणि कुस्तीपटूंचे नुकसान होऊ नये, यासाठी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी तातडीने या प्रश्नात लक्ष घालून, भारतीय कुस्तीला नव्याने संजीवनी आणि बळ देण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.