पुणे: औंध रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावले, नातेवाईकांचा आरोप

पुणे: औंध रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावले, नातेवाईकांचा आरोप

पुणे, पुढारी वृत्तसेवा: औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी 26 आठवड्यांच्या गर्भवतीला चिठ्ठी देऊन ससून रुग्णालयात पाठवले. ससूनला घेऊन जात असताना महिला रुग्णवाहिकेतच प्रसूत झाली आणि दुर्दैवाने बाळ दगावले. वेळेवर उपचार न मिळाल्याने आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळ दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित नर्सला नोटीस पाठवण्यात आली आहे.

मूळच्या दिघी येथील असलेल्या दीप्ती विरनळ प्रसूतीसाठी माहेरी पिंपळे गुरव येथे आल्या होत्या. त्या 26 आठवड्यांच्या गर्भवती होत्या; 23 फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोटात अचानक दुखू लागल्याने नातेवाइकांनी त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात आणले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तपासून इंजेक्शन दिले. महिलेची अवस्था गंभीर असल्याने आणि 7 महिनेही पूर्ण झाले नसल्याने ससून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला आणि त्यानुसार चिठ्ठी देण्यात आली. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने स्वत:च्या कारमधून नातेवाइकांनी गर्भवतीला महापालिकेच्या कुटीर रुग्णालयात नेले. तेथून ससूनला नेत असताना शिवाजीनगरजवळ रुग्णवाहिकेमध्येच महिलेची प्रसूती झाली. ससूनमध्ये तपासल्यानंतर बाळ दगावल्याचे समजले. औंध रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारांना नकार दिल्याने बाळ दगावल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, कारवाईची मागणी केली आहे.

महिलेचे पती शाम विरणक यांनी सांगितले की, पत्नीच्या पोटात दुखत असल्याने शुक्रवारी रात्री साडेतीन वाजता औंध रुग्णालयात गेलो होतो. तिची तपासणी करून दोन इंजेक्शन देण्यात आली; मात्र प्रकृती गंभीर असल्याने ससून रुग्णालयात घेऊन जा, असे सांगण्यात आले. ससूनमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली नाही.

गर्भवती महिलेला पहाटे 3.30 वाजता औंध रुग्णालयात आणले. त्यावेळी तपासणी करून गर्भवतीला दोन इंजेक्शन देण्यात आले. तेथून ससूनला घेऊन जायला सांगितले आणि चिठ्ठी दिली. इमर्जन्सी असतानाही रुग्णालयाकडून अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली नाही. नातेवाईक स्वत:च्या गाडीने महिलेला औंध कुटीर रुग्णालयात घेऊन गेले. तेथून रुग्णवाहिकेने ससूनला जात असताना रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली आणि बाळ दगावले. औंध रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने बाळ गमवावे लागले. याबाबत नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली आहे.

– शरद शेट्टी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना, उपाध्यक्ष, महाराष्ट्र

शुक्रवारी पहाटे 4 वाजता 26 आठवड्याची गर्भवती महिला औंध रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तपासले आणि इंजेक्शन दिले. डॉक्टरांनी प्रसूतीची तयारी दाखवली. मात्र, 7 महिने पूर्ण झाले नसल्याने बाळाला जन्मानंतर व्हेंटिलेटरची गरज भासली असती आणि आपल्याकडे लहान मुलांचा व्हेंटिलेटर नाही. त्यामुळे ससूनला घेऊन जाण्याची चिठ्ठी देण्यात आली. 108 रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही त्यांच्या कारने घेऊन गेले. थेट ससूनला जाण्याऐवजी महापालिकेच्या कुटीर रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनीही ससूनला जाण्यास सांगितले. बाळाचे निधन दुर्दैवी असून, संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच नर्सला नोटीस पाठवण्यात आली आहे.
– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news