Nagaland CM Neiphiu Rio : नागालँड मुख्यमंत्रीपदी नेफिओ रिओ यांनी घेतली पाचव्यांदा शपथ

Nagaland CM Neiphiu Rio : नागालँड मुख्यमंत्रीपदी नेफिओ रिओ यांनी घेतली पाचव्यांदा शपथ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजप- नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) युतीने बहुमत मिळवत सत्ता कायम ठेवली आहे. मागील २०१८ विधानसभा निवडणुकीत युतीला मिळालेले यश यंदाही कायम राहिले आहे. राज्याचे सर्वाधिक काळ ४ टर्म मुख्यमंत्री राहिलेले नेफिओ रिओ (Nagaland CM Neiphiu Rio) यांनी आज (दि.७) पुन्हा एकदा पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर तादितुई रंगकाऊ झेलियांग आणि यानथुंगो पॅटन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

कोहिमा येथे हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी जी कैटो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, पी पायवांग कोन्याक, मेत्सुबो जमीर, टेमजेन इम्ना अलॉन्ग, सीएल जॉन, सल्हौतुओनूओ क्रुसे आणि पी बाशांगमोंगबा चांग यांच्यासह ९ आमदारांनी नागालँड मंत्रिमंडळातील मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा  उपस्थित होते.

दरम्यान, एनडीपीपीच्या नवनिर्वाचित आमदारांची कोहिमा येथे झालेल्या बैठकीत रिओ (Nagaland CM Neiphiu Rio) यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. ते नागालँडच्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (NDPP) प्रमुख आहेत. रिओ यांनी नॉर्थन अंगामी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यापूर्वी रिओ हे चारवेळा मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. आता पुन्हा त्यांची पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

Nagaland CM Neiphiu Rio : रिओ यांचा राजकीय प्रवास

७४ वर्षीय नेफिओ रिओ विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय आहेत. ४९ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलेले रिओ १९७४ मध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या युवा शाखेचे अध्यक्ष होते. १९८९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला गती आली. मुख्यमंत्री जमीर यांच्या मंत्रिमंडळाच ते राज्याचे गृहमंत्री होते. २००२ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून नागा पीपल्स फ्रंटचे काम करण्यास सुरूवात केली. २००३ मध्ये जमीर यांना हटवून ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. २००८ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र दोन महिन्यांनीच निवडणुका झाल्या आणि ते पुन्हा सत्तेवर आले.

२००८ च्या निवडणुकीत, नागालँडच्या NPF-नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीने त्यांना मुख्यमंत्री बनवले. २०१३ च्या निवडणुका जिंकून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. २०१४ मध्ये निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले. मात्र, राज्याच्या राजकारणाची गरज ओळखून त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. २०१७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१८ मध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. एनपीएफ पक्षातील मतभेदानंतर त्यांनी एनडीपीपीची स्थापना केली.

विधानसभा निवडणुकीत भाजपने १२ जागा जिंकल्या आहेत. तर त्यांचा मित्रपक्ष एनडीपीपीने २५ जागा जिंकल्या आहेत. ६० सदस्यांच्या विधानसभेत एनडीपीपीने ४० जागा तर भाजपने २० जागा लढवल्या होत्या. नागालँडमध्ये काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही. अपक्षांनी चार जागा जिंकल्या, तर जनता दल युनायटेडने एक जागा, लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) दोन जागा जिंकल्या.

नागालँड विधानसभेसाठी १८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ६० जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. दरम्यान नागालँडमध्ये १३ लाख मतदार असून, ८२.४२ टक्के मतदान झाले होते. तेथील मतदारांनी पुन्हा एकदा भाजप- नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या पारड्यात भरभरून मते टाकली. आणि पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या युतीकडे सोपवल्या.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news