उद्यमशीलतावाढ गरजेची

उद्यमशीलतावाढ गरजेची
Published on
Updated on

एका अंदाजानुसार, पुढील वर्षी भारताच्या लोकसंख्येचे सरासरी वय 28 वर्षे असेल आणि त्याचवेळी चीन आणि अमेरिकेत हेच सरासरी वय 37 असेल. पश्चिम युरोपातील देशांत 45 आणि जपानमध्ये 49 वर्षे. अर्थात, या मनुष्यबळाच्या आधारावर आपण जगातील सर्वात तरुण देश आहोत. पण, या युवाशक्तीचा देशाला आपोआप फायदा मिळणार नाही, तर त्यासाठी देशातील बेरोजगारीच्या समस्येवर धोरणात्मक उपाय योजावे लागतील. त्याद़ृष्टीने उद्यमशीलतेत वाढ करणे गरजेचे आहे.

संसदेत देशातील वाढत्या बेरोजगारीचा मुद्दाही प्रकर्षाने पुढे आला आहे. राष्ट्रीय नमुना पाहणीनुसार, गेल्या वर्षी 8.2 टक्के इतका असलेला बेरोजगारीचा दर जानेवारी ते मार्च 2023 या काळात 6.8 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मात्र, 'सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी'च्या अहवालानुसार जुलै 23 मध्ये हा दर 7.95 टक्के इतका आहे. याच अहवालानुसार शहरी भागातील बेरोजगारीचा दर एप्रिल-जून 2023 या काळात 7.6 चा 6.6 झाला; पण ग्रामीण भागात ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर 8.96 टक्क्यांवरून 10.09 इतका झाला, तो दोन वर्षांतील सर्वाधिक आहे. 'फोर्ब्ज' मासिकाच्या आकडेवारीनुसार, 2008 मध्ये बेरोजगारीचा 5.41 असलेला दर ऑक्टोबर 2023 मध्ये 10.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.

भारतीय शिक्षण प्रणालीवर अनेक बाबतीत टीका केली जाते. भारतीय शिक्षणपद्धती ही घोकंपट्टीवर भर देणारी असल्याचेही म्हटले जाते. हाच विचार विद्यार्थ्यांना पुढे जाऊ देत नाही, असेही म्हटले जाते. परिणामी विद्यार्थ्यांत कल्पनाशक्ती, उद्यमशीलतेच्या विचारांना चालना मिळत नाही. नवे शिक्षण धोरण लागू केल्याने स्थितीत बदल पाहावयास मिळू शकतो. परंतु, हे जर तर आहे. आजही बहुतांश विद्यार्थी अभ्यास हा केवळ नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने करत आहेत. परंतु, नोकरी सर्वांनाच मिळते असे नाही. देशात बेरोजगारीची स्थिती गंभीर बनली आहे. कोरोना काळातील संकटाने देशातील स्थिती अधिकच शोचनीय झाली आहे. कोरोनाचा परिणाम कमी झाल्याने रोजगाराचे चित्रही सुधारण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली. परंतु, येत्या दहा-बारा वर्षांत प्रत्येकाच्या हाताला काम म्हणजेच सर्वांनाच रोजगार मिळण्याची शक्यता धूसरच दिसून आहे. अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर येत असल्याचे म्हटले जात आहे. पण, रोजगाराच्या स्थितीत बदल होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जोखीम कमी असल्याने सर्वांना नोकरीचे आकर्षण असते. दरमहा वेतन मिळण्याची हमी असते. कामाचे तास ठरलेले असतात आणि योग्य रीतीने काम केल्यास बढती मिळत राहते. परंतु, उद्योग क्षेत्रात जोखीम असते. तेथे बस्तान बसविण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी लागते.

उद्योजक बनण्याचा मार्ग हा नोकरीच्या तुलनेत कठीण मानला जातो. बहुतांश मंडळी सोपा मार्ग निवडण्यास प्राधान्य देतात. परंतु, असे काही तरुण आहेत की, ते जोखीम उचलण्याबाबत तयार असतात. आयआयटी, आयआयएममधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना कंपन्यांत गलेलठ्ठ पगार मिळतो. त्यांना नोकरीची संधी सतत उपलब्ध असतेच. परंतु, तेदेखील स्वतंत्र व्यवसायाला प्राधान्य देतात. याप्रमाणे भारतात व्यवसायभिमुख संस्कृती विकसित होत आहे. पण, अशा वेळी केवळ हुशार आणि सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांचा विचार होऊ नये. ज्यांना नामांकित संस्थेत प्रवेश मिळालेला नाही आणि अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळालेली नाही, अशा तरुणांना उद्योगाची संधी उपलब्ध करून देणे, हा त्यामागचा हेतू असायला हवा. उद्यमशीलतेचा प्रसार हा मध्य, निम्न मध्यमवर्गीय तसेच लहान शहरे, ग्रामीण भाग, तालुका पातळीवर होणे गरजेचे आहे. बेरोजगारी ही केवळ बेरोजगार व्यक्तीची समस्या नाही. त्यापासून होणार्‍या नुकसानीकडे व्यापक द़ृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कमी काळात रोजगार निर्माण करता येणार नाही. परंतु, तरुणांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रेरित करू शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news