समाजभान : ‘पॉक्सो’मध्ये सुधारणांची गरज?

समाजभान : ‘पॉक्सो’मध्ये सुधारणांची गरज?

देशात अल्पवयीन मुले-मुलींवर होत असलेले वाढते अत्याचार लक्षात घेता परस्पर लैंगिक संबंध संमतीचे वय 18 वरून 16 वर्षे करण्याचा विचार व्हावा, अशी विनंती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली होती. मात्र कायदा आयोगाने ही मागणी फेटाळून लावली आहे. परस्पर संमतीने प्रस्थापित होत असलेल्या लैंगिक संबंधासंदर्भात नवीन व्याख्या करणे गरजेचे आहे. इंटरनेट युगात मुले कमी वयातच प्रौढ होत आहेत, हे दुर्लक्षून चालणार नाही.

पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स या कायद्यानुसार संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचं वय 18 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. 2012 मध्ये करण्यात आलेल्या या कायद्याबाबत बरीच चर्चा गेल्या दशकभरामध्ये होत आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सातत्याने चर्चिला जात आहे, तो म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वय असणार्‍यांनी जर संमतीने लैंगिक संबंध ठेवले तर तो गुन्हा मानला जायला हवा की नको? या विषयावरून बर्‍याच काळापासून वादविवाद सुरू आहेत. आता 22 व्या कायदा समितीने संमतीचे वय 18 वर्षेच ठेवण्याची शिफारस केली आहे. वास्तविक हे वय कमी करून 16 वर्षे करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.

न्यायालयानेेसुद्धा अनेकवेळा स्पष्टपणे असे म्हटले होते की, पॉक्सो कायद्याचा उद्देश अल्पवयीनांना लैंगिक हिंसेपासून वाचवणे हा आहे. किशोरवयीनांच्या संमतीने केलेल्या लैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणे नाही. तथापि, कायदा आयोगाच्या मते संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 16 वर्षे केल्यास या कायद्याचा दुरुपयोग होईल. न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील 22 व्या लॉ कमिशनने आपला अहवाल कायदा मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे. यामध्ये आयोगाने वय कमी करण्याची शिफारस केलेली नाही; पण कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी काही सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. या कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी आयोगाने शिफारस केली आहे की, संमतीने लैंगिक संबंध ठेवणार्‍या अल्पवयीनांच्या वयाच्या अंतराचाही विचार करण्यात यायला हवा. आयोगाचे म्हणणे आहे की, जर वयातलं अंतर तीन वर्षे किंवा त्याहून जास्त असेल तर या संबंधांना गुन्हा ठरवता येईल.

यााबाबतची एक आकडेवारीही यानिमित्ताने विचारात घेतली पाहिजे. 28 राज्यांच्या 408 जलदगती न्यायालयात पॉक्सोचे 31 हजार खटले दाखल असून त्यापैकी केवळ 14 टक्के आरोपी दोषी आढळून आले आहेत. त्याचवेळी 43 टक्के प्रकरणातील आरोपी सबळ पुराव्याअभावी सुटले आहेत. या न्यायालयांत अजूनही 43 टक्के खटले प्रलंबित आहेत. मध्यंतरी संयुक्त राष्ट्राच्या वतीने आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पॉक्सो कायद्यामध्ये सुधारणासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मांडलेले मत, सल्ले हे चिंतनशील आणि विचार करण्यास भाग पाडणारे आहेत. त्यांनी असे म्हटले होते की, न्यायपालिकेने पॉक्सो कायद्यानुसार सहमतीचे वय कमी करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा कायदा 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांमध्ये घडलेल्या लैंगिक कृत्यांमध्ये त्यांच्यात परस्पर सहमती होती की नव्हती याची खातरजमा न करता गुन्हा मानतो. कारण या कायद्यातील तरतुदींनुसार 18 पेक्षा कमी वयोगटातील मुलीच्या परवानगीला महत्त्व नाही. यावर चिंता व्यक्त करताना सरन्यायाधीशांनी असे म्हटले की, अशी प्रकरणे न्यायालयात येतात तेव्हा न्यायाधीशांसमोर पेच निर्माण होतो आणि प्रश्न उपस्थित राहतात. या ज्वलंत मुद्द्यावर गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला त्यांनी यानिमित्ताने लोकप्रतिनिधींना दिला आहे.

सरन्यायाधीशांचे मत हे मद्रास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मांडलेल्या मतांनंतर आले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले होते की, पॉक्सोनुसार सहमतीचे वय कमी करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. जोपर्यंत हा कायदा 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील कोणत्याही मुलाला एक किशोरवयीन मुलगा समजत नाही तोपर्यंत न्यायालय सहमतीच्या वयावर अन्य मार्गाने व्याख्या करू शकत नाही. या विचारांच्याही पुढे जात न्यायाधीशांनी म्हटले की, मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी कुटुंबीयांनी देखील आवाज उठविला पाहिजे. कारण मुलांचे लैंगिक शोषण ही कुटुंबातच दडलेली एक समस्या आहे. या मुद्द्यावर सरकारने देखील पुढाकार घेत नागरिकांत सजगता निर्माण करावी, असे आवाहन केले आहे. कलम 15(3) मध्ये मुलांसाठी विशेष तरतूद केलेली आहे. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण, अत्याचार, तस्करी आणि अश्लील साहित्य यांसारख्या गंभीर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांना पायबंद बसविण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करताना 2012 मध्ये पॉक्सो कायदा लागू केला. या कायद्यात एकूण 46 तरतुदी आहेत.

मुलांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला किमान सात वर्षे ते आजन्म कारावासाच्या शिक्षेपर्यंतची तरतूद या कायद्यात केलेली आहे. त्यामुळे मुलांचे संरक्षण करण्यासाठी आणलेल्या कायद्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्यास मदत मिळाली. मात्र कायद्याशी संबंधित सर्वात ज्वलंत मुद्दा म्हणजे परस्पर संमतीने प्रस्थापित झालेले लैंगिक संबंध. आजघडीला न्यायालयात दाखल होणारी बहुतांश प्रकरणांचे आकलन केल्यास 16 ते 18 वयोगटातील मुलांत परस्पर सहमतीने प्रस्थापित झालेले संबंध देखील गुन्हेगारीच्या श्रेणीत आणले जात आहेत. जाणीवपूर्वक न झालेल्या घटनेतील गुन्ह्यापासून मुलांना वाचविण्यासाठी पॉक्सो कायद्यात लैंगिक संबंधासाठीच्या सहमतीच्या वयाशी असणारा मुद्दा चर्चेला जावा अशी मागणी होत आहे. अलीकडची उदाहरणे पाहिली तर या कायद्यात सहमतीशी संबंधित मुद्द्यावर बदल हा काळानुरूप आणि आवश्यक आहे, असे दिसून येते. 2012 ते 2021 च्या आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला तर मुलांत लैंगिक शोषणाच्या बाबतीत 48.66 टक्के आरोपी हे ओळखीचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. गोंधळात टाकणारी बाब म्हणजे 3.7 टक्के प्रकरणात आरोपी हा कुटुंबातील सदस्यच राहिला आहे. मात्र सहा टक्के प्रकरणात आरोपीचा मुलीशी किंवा मुलाशी ओळख नसल्याचे आढळून आले आहे.

दुसरीकडे, या प्रकरणातील खटल्यांचा निपटारा हा संथगतीने होत आहे, हे देखील तितकेच खरे. 2016 मध्ये 60 टक्के प्रकरणे एका वर्षात निकाली काढण्यात आली होती; पण 2018 मध्ये हे प्रमाण 42 टक्के राहिले आंहे. 2020 मध्ये 19.7 टक्के तर 2021 मध्ये केवळ 20 टक्के प्रकरणे निकाली काढण्यात आली. पोक्सो न्यायालयात प्रलंबित खटल्यांची संख्या ही दरवर्षी 20 टक्क्यांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. दहा टक्क्यांपेक्षा अधिक प्रकरणात न्याय मिळण्यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ लागत आहे. म्हणजेच या प्रकरणात दोषींना शिक्षा मिळत असताना त्या तुलनेत दोषमुक्त आरोपींचे प्रमाण हे तीन पट अधिक आहे. आज पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे नोंद होण्याचे सर्वात कमी म्हणजे 19.7 टक्के प्रमाण तामिळनाडूत आहे; तर सर्वाधिक प्रमाण 77.7 टक्के उत्तर प्रदेशात आहे.

ही सर्व परिस्थिती विचारात घेता पॉक्सो कायद्यानुसार परस्पर संमतीने प्रस्थापित होत असलेल्या लैंगिक संबंधासंदर्भात नवीन व्याख्या करणे गरजेचे आहे. यामागचे कारण म्हणजे बदलत्या काळात सोशल मीडियाचा विस्तार अणि माहितीचा स्फोट यामुळे तरुण हे कमी वयातच प्रौढ होत आहेत. मैत्रीच्या नव्या आणि मुक्त संस्कृतीमुळे लैंगिक संबंधाच्या पारंपरिक संकल्पनांना छेद देत त्यात मोकळेपणा आला आहे. कुटुंब अणि शाळेेचा प्रभाव देखील त्यापुढे फिका पडत चालला आहे. त्यामुळे समाजशास्त्रज्ञदेखील वेगाने बदलणार्‍या वैश्विक समाजातील सामाजिक संबंधाच्या रचनेला नव्याने परिभाषित करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news