सध्याचे राजकारण आर्थिक निकषावर चालणारे; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खंत

सध्याचे राजकारण आर्थिक निकषावर चालणारे; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खंत

वडगाव मावळ, पुढारी वृत्तसेवा: पूर्वी सामाजिक बांधिलकीच्या विचारधारेवर चालणारे राजकारण अलीकडच्या काळात आर्थिक निकषावर चालत आहे. त्यामुळे राजकारणातील सामाजिक बांधिलकी हरवत चालली आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात मावळ विचार मंचाच्या वतीने आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना 'राजकारण व सामाजिक बांधिलकी' या विषयावर ते बोलत होते. या वेळी आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मंचाचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, अध्यक्ष सुदेश गिरमे आदी उपस्थित होते.

कंत्राटी कार्यकर्त्यांची जास्त गर्दी

यापूर्वी पक्ष संघटनेला व संघटनेच्या तत्त्वांना जास्त महत्त्व होते. अलीकडच्या जिवाभावाच्या खर्‍या कार्यकर्त्यांपेक्षा कंत्राटी कार्यकर्त्यांची गर्दी जास्त झाली असून, निवडून आलेला प्रतिनिधी पुढच्या निवडणुकीत त्याच पक्षात राहील याची शाश्वती देता येत नाही. ही स्थिती लोकशाहीसाठी घातक असून, सदवर्तन व सामुदायिक जबाबदारीतून ही परिस्थिती बदलू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सुनील शेळके यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांना सामावून घेऊन श्रोत्यांनाही नवनवीन विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या मावळ विचार मंचाच्या धोरणाचे कौतूक केले. सुदेश गिरमे यांनी स्वागत केले, भास्करराव म्हाळसकर यांनी आभार मानले, भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले व अतुल राऊत यांनी
आभार मानले.

निवडणुकामध्ये पैशाला आले महत्त्व

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पूर्वी एक विशिष्ट विचारधारा, संस्कार व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून राजकारण चालत होते. त्यामुळे निवडणुकाही याच मुद्द्यावर होत होत्या. अलीकडच्या काळात मात्र हेच मुद्दे बाजूला आहेत व निवडणुकामध्ये पैशाला जास्त महत्त्व आले आहे. जास्त खर्च केला की निवडणुकीत विजय होतो, ही मानसिकता धक्कादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

logo
Pudhari News
pudhari.news