ठाणे, पुढारी वृत्तसेवा : हर हर महादेव या मराठी चित्रपटात शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा दाखवला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथील शो बंद पाडला. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाने चित्रपटाचे पैसे परत मागितले. तसेच कोण जितेंद्र आव्हाड? असा सवाल यावेळी या प्रेक्षकाने उपस्थित केला. यानंतर त्या प्रेक्षकास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी 'हर हर महादेव' हा शिवाजी महाराजांवरील चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध सुरू झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी (दि.७) रात्री दहा वाजता विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका प्रेक्षकांने तिकिटाचे पैसे परत द्या. आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे, अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या या दर्शकांनी त्यांचे ऐकले नाही, अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
इतिहासाची मोडतोड करून हा चित्रपट दाखवल्या जात असल्याचा आरोप यावेळी आव्हाड यांनी केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली विकृत परंपरा आता चित्रपटांच्या माध्यमातून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही विकृती आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देत हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.