पुणे: निरा-डाव्या कालव्याचे श्रेय राष्ट्रवादीने घेऊ नये

पुणे: निरा-डाव्या कालव्याचे श्रेय राष्ट्रवादीने घेऊ नये

भोर, पुढारी वृत्तसेवा: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून न केलेल्या कामांचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यानी घेऊ नये, अन्यथा भूमिपूजन कामाच्या वेळी काळे झेंडे लावून कामाचा जाहीर निषेध करण्यात येईल, असा इशारा निरा – डावा कालवा प्रकल्प समितीचे अध्यक्ष बबनराव खाटपे यांनी दिला आहे.

कालव्याची निविदा प्रक्रिया झालेली नसताना भूमिपूजन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून खासदारांना बोलावून मंगळवारी ( दि. 18) भूमिपूजन करण्याचा घाट सुरू केला आहे. कालव्याचे भूमिपूजन करणे म्हणजे शेतकरी व स्थानिक ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी निरा डाव्या कालव्याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी स्थानिक शेतकर्‍यांना विश्वासात व विचारात घेऊन प्रत्यक्ष स्थळावर जाऊन विचारविनिमय करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली असून कामाची प्रक्रिया सुरू आहे. निरा डावा कालव्याबाबत वेळोवेळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडून तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेशी चर्चा करून थोपटे यांनी हा प्रश्न मार्गी लावलेला आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे यामध्ये काहीच योगदान नसताना हे भूमिपूजन करू नये. हे भूमिपूजन तत्काळ थांबवावे अन्यथा निरा – देवघर डावा कालवा प्रकल्प समितीचे अध्यक्ष बबनराव खाटपे, सचिव आनंदा सणस, माजी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, सरपंच काशिनाथ साळुंखे, युवक अध्यक्ष नितीन दामगुडे, विजय भालेघरे, नथुराम दामगुडे, बाबू कंक, लक्ष्मण कुमकर, संपत साळुंखे, पंढरीनाथ दामगुडे, खुशाबा दुधाणे, शंकर दुधाणे, उपसरपंच प्रदीप पिलाणे, रामचंद्र कुमकर व स्थानिक शेतकरी, पदाधिकारी हे कार्यक्रमाचा जाहीर निषेध करून काळे झेंडे दाखवणार आहेत, असा इशारा कालवा समितीने दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news