Ajit Pawar news | नॉट रिचेबल अजित पवार अखेर अवतरले, जाणून घ्या पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Ajit Pawar news | नॉट रिचेबल अजित पवार अखेर अवतरले, जाणून घ्या पडद्यामागे नेमकं काय घडलं?

पुणे; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार सात आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, आज शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात अवतरले. एका ज्वेलरी दुकानाच्या उद्घाटनाला ते सपत्नीक हजर राहिले. अजित पवार काल शुक्रवारी सकाळी पुण्यात होते. पण त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही. ते ७ आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. (Ajit Pawar news)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, काल शुक्रवारी पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्बेत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो. माध्यमांनी 'नॉट रिचेबल'च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवाण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. पुणे येथे एका नियोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

तर तुमच्या समोर नाही म्हणजे नॉट रिचेबल नव्हे : शरद पवार

अजित पवारांच्या नॉटरिचेबलबद्दल पत्रकाराने विचारले असता. शरद पवार यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले अजित पवार तुमच्या समोर नाहीत म्हणजे ते नॉटरिचेबल नाही.  अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली.

शुक्रवारचा दिवस अजित पवार यांच्याबद्दलच्या गूढ प्रश्नांनी सुरु झाला आणि प्रश्न अनुत्तरीत ठेवूनच तो मावळला. सकाळी मांजरीकडे कार्यक्रमासाठी जात असताना तो कार्यक्रम रद्द करून अजित पवार पुण्यात परतले. पाठोपाठ त्यांचे दोन दिवसातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र तशी अधिकृत घोषणा कुणी केली नाही की कार्यक्रम रद्द करण्याची कारणेही कुणी दिली नाहीत. हा प्रकार नेमका काय आहे याचे गूढ कायम ठेवून दिवस मावळला आणि रात्री पुन्हा अजित पवारांच्यासंदर्भात नव्या चर्चेने जन्म घेतला.

दरम्यान, अजित पवारांशी कुणाचाही संपर्क होत नसून राष्ट्रवादीच्या सात ते दहा आमदारांसह ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला. आमदारांची संख्या इतकी कमी कशी इथंपासून तर नॉट रिचेबल होण्याचे कारण काय, असे प्रश्न पडले होते. पण त्यांची उत्तरे देण्यासाठी मात्र कुणीही उपलब्ध नव्हते. परिणामी अजित पवार यांच्या हालचालींबद्दलचे गूढ कायम राहिले होते.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याने विविध तर्कवितर्क लढवण्यात आले. अजित पवार अचानक नॉट रिचेबल होण्यामागे कोविड, नव्या राजकीय समीकरणांसह विविध तर्क काढण्यात आले. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट, शरद पवार यांनी उद्योगपती अदानी यांची केलेली पाठराखण अशा अनेक घटनांचा संदर्भ जोडण्याचे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Ajit Pawar news)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news