NCP Jayant Patil : ‘ईडी’च्या नोटीसीनंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

NCP Jayant Patil : ‘ईडी’च्या नोटीसीनंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुढारी ऑनलाइन डेस्क :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने ('ईडी') नोटीस बजावली आहे. याबाबत त्‍यांनी आज माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, " बुधवारी सायंकाळी सहा वाजता मला नोटीस मिळाली. मला उद्याच चौकशीला बोलवले आहे. आयएल आणि एफएस प्रकरणी मला नोटीस पाठवली आहे; पण  या कंपनीशी माझा कधी संबंध आला नाही आणि मी कधी कोणाशी या संदर्भात बोललोही नाही. मी चाैकशीला सामाेरे जाईन,  माझी राजकीय कारकीर्द ही खुली किताब आहे.
( NCP Jayant Patil)

जयंत पाटील यांना 'ईडी'ने शुक्रवार 12 मे राेजी चाैकशीसाठी हजर राहण्‍याचे आदेश दिले आहेत. आयएल आणि एफएसच्या कथित घोटाळ्या प्रकरणी  हा समन्स बजावण्यात आला आहे. जयंत पाटील यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 NCP Jayant Patil : काय आहे आयएल आणि एफएस ?

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची 'ईडी'कडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्याचा काही संदर्भ या नोटीसी मागे आहे का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात सुरू आहे.

आयएल आणि एफएस कंपनी

इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) ही एक भारतीय राज्य-अनुदानित पायाभूत सुविधा विकास आणि वित्त कंपनी आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी तयार केली आहे.

IL&FS ची स्थापना 1987 मध्ये "RBI नोंदणीकृत कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी" म्हणून तीन वित्तीय संस्थांनी केली, जसे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (HDFC) आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (UTI), यांनी प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वित्त आणि कर्ज प्रदान करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली.

आम्‍ही घाबरत नाही : विद्या चव्हाण

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना जयंत पाटील यांना आलेल्या या समन्समुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान याबाबत अद्याप जयंत पाटील यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण या समन्स प्रकरणी भाजपवर थेट आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना यापूर्वीही ईडीने समन्स बजावले आहे. ते काही नवीन नाही. मात्र, आतापर्यंत जयंत पाटील यांना कधीही ईडीकडून समन्स आलेले नव्हते. जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजप आता थेट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहे, असा थेट आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.

तसेच यावेळी त्या असेही म्हणाल्या की शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना यापूर्वी ईडीच्या अशा नोटीस आल्या आहेत. मात्र, आम्ही याला घाबरत नाही. उलट यामुळे राष्ट्रवादी आणखी भक्कम होत असते, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news