ब्रेकिंग : नायब सिंग सैनी हाेणार हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

ब्रेकिंग : नायब सिंग सैनी हाेणार हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणा भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष नायब सिंग सैनी हे हरियाणाचे नवे मुख्‍यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन आज (दि.१२मार्च) सकाळी हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर तुटली. मुख्‍यमंत्रीपदाचा मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला होता.

हरियाणाचे भाजप आमदार कृष्ण लाल मिद्धा यांनी 'एएनआय'शी बाेलताना सांगितले की,  "नायब सिंग सैनी हे हरियाणाचे  मुख्यमंत्री असतील. भाजपचे आमदार लवकरच  राज्यपालांना भेटणार आहेत." एकूण ९० आमदार असणार्‍या हरियाणा विधानसभेत भाजपचे ४१, काँग्रेसचे ३०, जजपचे १०, 'आयएनएलडी' एक, हरियाणा लोकहित पार्टीचा एक आणि सात अपक्ष आमदार आहेत. अपक्षांपैकी सहा आमदार भाजपसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नायब सिंग सैनी यांची राजकीय कारर्कीद

माजी मुख्‍यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती अशी ओळख असणार्‍या नायब सैनी यांचा जन्म २५ जानेवारी १९७० रोजी अंबाला येथील मिर्झापूर माजरा गावात झाला. बीए. एलएलबी असे त्‍यांचे शिक्षण झाले आहे. सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ओबीसी समाजातील नेते, अशीही त्‍यांची ओळख आहे.  ते 2002 मध्ये युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस झाले. 2005 मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हाध्यक्ष होते. सैनी 2009 मध्ये किसान मोर्चा भाजप हरियाणाचे प्रदेश सरचिटणीसही होते. 2012 मध्ये ते अंबाला भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. 2014 मध्ये सैनी यांनी नारायणगड विधानसभेतून निवडणूक जिंकली. 2016 मध्ये त्यांनी हरियाणा सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले हाेते. २०१९ लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्र मतदारसंघातून निवडणूक जिंकले हाेते. काही दिवसांपूर्वीच त्‍यांची हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. आता लाेकसभा निवडणुकीपूर्वी त्‍यांच्‍याकडे मुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी साेपविण्‍यात आली आहे.

भाजप बहुमत कसे गाठणार?

हरियाणा विधानसभेत एकूण ९० जागा आहेत. भाजपचे ४१ आमदार आहेत. जननायक जनता पक्षाचे १० आमदार आहेत. सात अपक्षही भाजपसोबत आहेत. त्‍यामुळे राज्‍यातील भाजपची सत्ता अबाधित राहणार आहे. काँग्रेसचे ३० आमदार आणि INLD आणि हरियाणा लोकहित पक्षाचे प्रत्येकी एक आमदार याशिवाय सात अपक्ष आमदार आहेत. बहुमताचा आकडा ४६ आहे. जेजेपीसोबतची युती तोडल्यानंतर भाजपला स्वबळाचे ४१, सात अपक्ष आणि हरियाणा लोकहित पार्टीचा आमदारांचा पाठिंबा आहे. तसेज जननायक जनता पक्षाचे काही आमदार भाजपमध्‍ये प्रवेश करतील, अशीही शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरुन भाजप आणि जजपमध्‍ये एकमत झाले नाही. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या निवासस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदारांची बैठक झाली तर भाजपने केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांच्‍या उपस्‍थितीत बैठक घेतली. यानंतर 'भाजप-जजप' युतीत फूटीवर शिक्‍कामोर्तब झालं. अखेर मनोहर लाल खट्टर यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

'भाजप-जजप' युतीत मतभेदाचे कारण काय?

हरियाणामध्‍ये ऑक्‍टोबर २०१९ मध्‍ये विधानसभा निवडणूक झाली. भाजपने ९० पैकी ४० जागा जिंकल्‍या. बहुमतापासून वंजिच राहिल्‍याने अखेर १० आमदारांचे संख्‍याबळ असणार्‍या दुष्‍यंत चौटाला यांच्‍या जननायक जनता पक्षाबरोबर युती केली. दुष्‍यंत चौटाला हे उपमुख्‍यमंत्री झाले. चौटाला यांनी मंगळवार ११ मार्च रोजी भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जेपी नड्डा यांच्याशी लोकसभा जागावाटपाची चर्चा केली. २०१९मध्‍ये भाजपने हरियाणातील लोकसभेच्‍या सर्व १० जागा जिंकल्‍या होत्‍या. आता आगामी लोकसभा निवडणूकही भाजप स्‍वबळावर लढण्‍याच्‍या तयारीत आहे;पण जजपने दोन जागांची मागणी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news