नवाब मलिक सहकार्य करीत नाहीत, धमकावतात : ईडीचा आरोप

नवाब मलिक सहकार्य करीत नाहीत, धमकावतात : ईडीचा आरोप

Published on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. मात्र नवाब मलिक हे तपासात सहकार्य करीत नाहीत, उलट धमकावतात, असे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा फराज याला समन्स बजावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने बुधवारी पहाटे नवाब मलिक यांच्या घरी छापेमारी करून त्यांना अटक केली होती. विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यानुसार ईडीचे अधिकारी कोठडीमध्ये नवाब मलिक यांची कसून चौकशी करत आहेत. ईडी कोठडीतील चौकशी दरम्यान, नवाब मलिक हे सहकार्य करीत नाहीत. उलट ईडीच्या अधिकार्‍यांना धमकावत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. त्यामुळे कुर्ला जमीन व्यवहारात सक्रिय असलेल्या नवाब मलिक यांचा पुत्र फराज याला समन्स बजावून ईडी त्याच्याकडे चौकशी करणार आहे. फराज यानेच विक्री करारासह मालमत्तेशी संबंधित अन्य कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. तसेच त्याने हसीना पारकर हिच्यासह तिच्या साथीदारांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात इतर दोघांसह भेट घेत त्यांना 55 लाख रुपये दिले होते. या मालमत्तेचा सौदा 1999 ते 2003 या दरम्यान झालाहोता.

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांचा भाऊ इकबालसोबत काम करत असलेल्या आणि त्यांचा दुसरा भाऊ अस्लम याला ओळखत असलेल्या अहमदउल्ला अन्सारी यांचा जबाब नोंदविला आहे. अन्सारी आणि अस्लम हे दोघे फराजसोबत हसीना पारकर हिच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात 50 लाख रुपये रोख आणि 5 लाखांचा धनादेश तिला देण्यासाठी गेले होते. यावेळी हसीनाचा विश्‍वासू सहकारी सलीम पटेल हा तेथे उपस्थित होता, असे ईडीचे म्हणणे आहे.

हेही वाचलत का ?

logo
Pudhari News
pudhari.news