आजपासून मंगलमय नवरात्रौत्सवास प्रारंभ

आजपासून मंगलमय नवरात्रौत्सवास प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्राचीन भारतीय कृषी संस्कृतीचा वारसा जपणार्‍या नवरात्रौत्सवाच्या चैतन्यदायी, मंगलमय पर्वास रविवारी (दि. 15) घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. पारंपरिक पद्धतीने रविवारी सकाळी साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर श्री करवीर निवासिनी अंबाबाई, नवदुर्गा, जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिर, शहरातील विविध मंदिरांसह घराघरात पारंपरिक धार्मिक विधींसह घटस्थापना करण्यात येणार आहे.

नवरात्रौत्सवासाठी करवीर नगरीत राज्यासह देशभरातून सुमारे 20 लाख भाविक उपस्थिती लावण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, नवरात्रौत्सवात होणार्‍या संभाव्य गर्दीच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यात देवस्थान समिती, पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, वाहतूक विभाग, अग्निशमन दल यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर परिसरातील सभोवतालच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही, दर्शन रांगेत बॅरिकेडस्, उन्हापासून रक्षणासाठी मंडप व छत उभारणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचार, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस व सुरक्षारक्षक, स्वयंसेवकाची सेवा पुरविली जाणार आहे.

अंबाबाई मंदिरात साडेआठ वाजता घटस्थापना

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे मंदिरात धार्मिक विधी होणार असून सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. यानंतर आरती, साडेअकरा वाजता पंचामृत अभिषेक व दुपारी दोन वाजता आरतीनंतर देवीची पारंपरिक अलंकारिक पूजा बांधली जाणार आहे. जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरातही पहाटे 5 वाजता देवीला अभिषेक होणार आहे. नवरात्रौत्सवानिमीत्त अंबाबाई मंदिर विविधरंगी नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळवण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या अंतर्गत परिसराचीही विविध फळा-फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवात देवीची दररोज विविध रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. नवरात्रौत्सवाच्या पूर्वसंध्येला (शनिवारी) श्री अंबाबाईची पारंपरिक पद्धतीची पूजा बांधण्यात आली होती.

घटस्थापना मुहूर्त दुपारी पावणेदोनपर्यंत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रविवारी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे पाचपासून ते दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल, असे दाते पंचांगाचे मोहन दाते यांनी सांगितले.

19 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून, 21 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. 22 ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा आहे आणि 23 ऑक्टोबर रोजी सोमवारी नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) आहे आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी (दसरा) आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन आणि दसरा एका दिवशी येतात. मात्र यावेळेस दसर्‍याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. ज्यांना 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही, त्यांनी 17 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर यापैकी कोणत्याही एका दिवशी घटस्थापना करावी आणि 23 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे, असेही दाते यांनी सांगितले.

विजयादशमीला विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2 वाजून 18 मिनिटे ते 3 वाजून 4 मिनिटे या दरम्यान असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news