भक्तिमय वातावरणात नवरात्रौत्सवाला प्रारंभ

भक्तिमय वातावरणात नवरात्रौत्सवाला प्रारंभ
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : घंटानाद… मंत्रोच्चार… सनई चौघड्याचे सूर… घटाची स्थापना… तोफेची सलामी… पालखी सोहळ्यासह 'अंबामाता की जय' अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात रविवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी, टेंबलाई, महाकाली, कात्यायनी, जोतिबासह सर्वच मंदिरांमध्ये दर्शनाला गर्दी होती. पहाटेपासून अंबाबाई मंदिर गर्दीने फुलले होते. यंदा प्रथमच शेतकरी संघाचा दर्शन मंडपासाठी वापर झाल्याने जुना राजवाडा परिसराने मोकळा श्वास घेतला. अंबाबाईची सिंहासनारूढ बैठी पूजा बांधण्यात आली होती.

रविवारी पहाटे घंटानादाने धार्मिक सोहळ्यांना सुरुवात झाली. हक्कदार श्रीपूजकांनी दरवाजा उघडल्यानंतर खडी साखर – लोणी नैवेद्य दाखवला. एकारती व कापूर आरतीनंतर साडेपाच वाजता मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. परंपरेप्रमाणे सकाळी 8 वाजता घटस्थापना खातेदार श्रीपूजक शेखर मुनिश्वर, सुहास जोशी यांनी केली. तोफेची सलामी देऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाल्याचे जाहीर करण्यात आले. माजी खासदार संभाजीराजे, मालोजीराजे यांच्या हस्ते पूजा झाली.

शहरातील टेंबलाई, कात्यायनी, महाकाली, तुळजाभवानी, कमलजादेवी, एकवीरा देवी, मरगाई देवी, गजेंद्रलक्ष्मीसह सर्वच मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली. घरोघरीही घटाची स्थापना दुपारपर्यंत पूर्ण झाली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता आरती व अभिषेक झाले. दुपारी देवीची पारंपरिक सिंहासनारूढ बैठी पूजा बांधण्यात आली होती.

मंदिर परिसरात गर्दी

यंदा प्रथमच दर्शन रांगेसाठी जुना राजवाडा परिसरातील शेतकरी संघाच्या हॉलचा वापर करण्यात आला आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शन रांगेत थांबले होते. पुढे ही दर्शन रांग पूर्व दरवाजातून आत नेण्यात आली. मुख्य दर्शन रांगेसोबतच कासव मंडप, महाद्वारसमोर रॅम्प उभारून मुख दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. मंदिर आवारात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांसाठी उपलब्ध होती.

अंबाबाईची सिंहासनारूढ पूजा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई ही आदिशक्ती होय. नवरात्रातील प्रतिपदेस तिची सिंहासनारूढ रूपात पूजा बांधली जाते. सिंहासनामध्ये सिंहाचा मुखवटा, पाय यांच्या आकाराचा अंतर्भाव असतो. कारण सिंह हे शौर्य, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य आणि सत्ता यांचे प्रतीक आहे. सिंहासनावर विराजमान होणारे देव व राजे हे सार्वभौमत्व दर्शवितात .श्री अंबाबाई ही विश्वाची सार्वभौम सत्ताधीश आहे, अशी श्रद्धा असल्यामुळेच सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती. पूजेमध्ये श्री अंबाबाई राजराजेश्वरी या स्वरूपात भक्तांना मनोवांच्छित फल प्रदान करण्यासाठी सिंहासनावर विराजमान आहे. अत्यंत वैभवशाली व प्रसन्न असे हे देवीचे रूप द्विभुज आहे. उजव्या हाताने ती आशीर्वाद व अभय देत आहे; तर डाव्या हातात कमळ आहे. कमळ हे सौंदर्य व ज्ञानाचे प्रतीक आहे. ही पूजा श्रीपूजक आनंद मुनिश्वर, किरण मुनिश्वर, मयूर मुनिश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली होती.

रात्री 9.30 वाजता देवीची पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये आणि फुलांची उधळण करत पालखी सोहळा पार पडला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news