राष्‍ट्रीय : हळदीची पेटंट लढाई

राष्‍ट्रीय : हळदीची पेटंट लढाई
Published on
Updated on

हळदीच्या पेटंटबाबत अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने अलीकडेच जिंकला आहे. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या किंवा नवसंशोधनांच्या क्षेत्रातच नव्हे, तर आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सध्या जगभरामध्ये भारतीय प्राचीन परंपरेचा आणि आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या समृद्ध संस्कृतीचा बोलबाला आहे. योगासारख्या अस्सल भारतीय जीवन पद्धतीला जगभरातील शंभराहून अधिक देशांनी योग दिनाच्या रूपाने स्वीकारले आहे. माणूस हा निसर्गाचाच अंश आहे, हे मूळ तत्त्व मानणार्‍या आयुर्वेदाचा प्रसार आता जगभर होत आहे. आयुर्वेद ही आपली पारंपरिक संपत्ती असून, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आयुर्वेदिक औषधांची परिणामकारकता वाढविण्याच्या द़ृष्टीने संशोधन सुरू झाले आहे. आयु आणि वेद या दोन शब्दांच्या मिलनातून आयुर्वेद शब्द तयार झाला आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे विज्ञान होय. जीवन देणारे विज्ञान म्हणजेच आयुर्वेद.

प्रारंभिक काळात आयुर्वेदाचे ज्ञान केवळ मौखिक स्वरूपातच उपलब्ध होते. आयुर्वेदाचे पहिले लिखित पुरावे वेदांमध्ये मिळतात. 'अथर्ववेदा'त 114 श्लोकांमध्ये आणि मंत्रांमध्ये आयुर्वेद चिकित्सा प्रणालीचा उल्लेख आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली 'चरकसंहिता', 'सुश्रुतसंहिता' आणि 'अष्टांग हृदया' हे तीन ग्रंथ आयुर्वेदातील प्रमुख ग्रंथ मानले जातात. आयुर्वेदिक चिकित्सा ही औषधी वनस्पती, जडीबुटी आणि अन्य नैसर्गिक घटकांवर आधारित आहे.

भारतीयांच्या रोजच्या आहारात, वापरात यातील अनेक वनौषधींचा समावेश झाला आहे. प्राचीन काळापासून आजीबाईचा बटवा म्हणून या वनौषधींच्या साहाय्याने अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार केले जात आहेत. हे उपचार भारतीय समाजाच्या अंगवळणी पडल्यामुळेच कदाचित अनेकांना त्याचे मोल फारसे वाटत नाही. परंतु, याच वनौषधींमधील पोषक तत्त्वे काढून घेऊन पाश्चिमात्य प्रगत कंपन्या विविध उत्पादने बाजारात आणतात तेव्हा त्यांची खरेदी आपण अगदी विश्वासाने करतो.

आज बाजारात असणारे कोणतेही पेनबाम पाहिल्यास, त्यामध्ये जवसाचे तेल असते. पण, आपल्याकडे जवसाचे तेल पूर्वीपासून अंगाला चोळले जायचे. जवसाच्या तेलात गावरान तुपाच्या चौपट प्रमाणात ओमेगा-3 अ‍ॅसिड असते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. प्रचंड उपयुक्तता असूनही आपण याकडे लक्षच दिले नाही. ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात इंग्रजांनी याच भारतभूमीतून असंख्य मौलिक गोष्टींची लूट केली. इथला कापूस विदेशात नेऊन तेथील कापड गिरण्या चालवल्याचा इतिहास आपण जाणतो. कालौघात आपल्याकडील समृद्ध ठेव्याविषयी, पारंपरिक ज्ञानाविषयी जागरूकता येत गेली असली तरी आजही स्थिती फारशी सकारात्मक नाही.

प्रगत राष्ट्रांमध्ये याउलट स्थिती दिसून येते. ही राष्ट्रे आपल्याकडील अमूल्य किंवा दुर्मीळ गोष्टींबाबत किंवा नव्या संशोधनांबाबत तत्काळ पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. एकदा पेटंट मिळाले की, त्यातून अर्थार्जनाचे एक नवीन दालन खुले होते. नव्याने आणि वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामुळे पेटंट घेण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे. संगणकाच्या क्षेत्रात 24 वर्षांहून अधिक काळ आघाडीवर असलेल्या आयबीएम कंपनीने 2016 मध्ये अमेरिकी पेटंटस्चे सगळे विक्रम मोडीत काढले. या कंपनीने एकाच वर्षात 8088 पेटंट घेतले. यापैकी 658 पेटंट भारतीयांनी लावलेल्या शोधांसाठीचे आहेत.

पेटंटच्या क्षेत्रात सध्या जगभरात एका अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीची चर्चा आहे, ती म्हणजे हळदीच्या पेटंटची! हळदीच्या पेटंटबाबत अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने अलीकडेच जिंकला आहे. 23 ऑगस्ट 1997 पासून हा लढा सुरू होता, हे लक्षात घेतले पाहिजे. मिसिसिपी विद्यापीठामधील दोन संशोधकांनी 1995 मध्ये हळदीने जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर अमेरिकेत पेटंट मिळवले होते. याचाच अर्थ, त्यांच्या परवानगीशिवाय हळदीचा औषधी वापर करता येणार नव्हता. जर करायचाच झाला, तर रॉयल्टी म्हणून त्यांना प्रचंड प्रमाणात पैसा द्यावा लागणार होता.

विशेष म्हणजे हळदीचे पेटंट अमेरिकेत फाईल करणारे संशोधक हरिहर कोहली आणि सुमन दास हे दोघेही भारतीय होते. ही बाब 'वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदे'चे संचालक म्हणून रुजू झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना समजली तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण भारतात शेकडो वर्षांपासून हळदीचा औषधी वापर केला जात आहे. असे असताना, अमेरिकेला याबाबतचे पेटंट मिळणे हा भारतावर अन्याय होता. त्यामुळे 'भारतीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे'ने याला आव्हान दिले. हळदीसाठी भारत आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे राहिले. अर्थात ही लढाई सोपी नव्हती. यासाठी हळदीचा हा गुणधर्म भारतातील लोकांना हे पेटंट फाईल होण्याआधीपासून माहीत होता, हे सिद्ध करणे गरजेचे होते.

'सीएसआयआर'ने त्यासाठी तब्बल 32 संदर्भ शोधून काढले. हळदीचे अँटिसेप्टिक गुणधर्म भारताच्या पारंपरिक ज्ञानात येतात आणि त्यांचा उल्लेख भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथातही आहे, ही बाब भारताने निदर्शनास आणून दिली. त्यामुळे प्रदीर्घ लढ्यानंतर अखेरीस हे पेटंट अमेरिकन पेटंट ऑफिसने नाकारले आहे. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा अभ्यास करून ही लढाई जिंकली. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. या लढ्याबाबत आणि विजयाबाबत डॉ. माशेलकर सरांचे आभार मानतानाच, या प्रकरणातून धडा घेण्याचीही गरज आहे.

कुठल्याही छोट्या-मोठ्या जखमेवर हळद लावली की फरक पडतो, रक्तस्राव थांबतो, त्यावर जंतुसंसर्ग होण्यापासून बचाव होतो. हे ज्ञान आपल्याकडे सुशिक्षित-अशिक्षित, गावकरी-शहरकरी सर्वांनाच आहे. परंतु, हा एक शोध असू शकतो हे कुणाच्या गावीच नव्हते. कारण पेटंट हा प्रकार माहीत असला तरी ते मिळविण्याबाबत आजही आपल्याकडे मोठी उदासीनता आणि अपुरे ज्ञान आहे. एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीने तयार केली की, त्या वस्तूचे पेटंट त्यांना नोंदवता येते आणि एकदा पेटंटची नोंद झाली की, त्याच्या वस्तूची नक्कल अन्य कोणी करू शकत नाही, ही ढोबळ कल्पना आपल्याला आहे. परंतु, पेटंट नोंदवण्याच्या बाबतीतही आपण उदासीन आहोत.

याबाबतीत अमेरिकन लोक कमालीचे जागरूक आहेत. त्यांनी केलेल्या छोट्या-मोठ्या नावीन्यपूर्ण गोष्टींचे ते लगेच पेटंट घेतात. 2015 या वर्षाचे उदाहरण घेतल्यास, त्यावर्षी अमेरिकेत एकंदर 65 हजार पेटंट नोंदले गेले होते. पाण्याची बाटली विकणार्‍या हजारो कंपन्या जगात आहेत. परंतु एका कंपनीने आपल्या बाटलीचे डिझाईन तयार करताना, तिच्या मध्यभागी बाटली गोलाईला कमी केली. जो भाग हातात पकडून सहजपणे पाणी पिता येते. ही एक छोटीच गोष्ट आहे, पण तिचेही पेटंट घेतले गेले आहे. भारतात अशा कित्येक कल्पना राबवल्या गेल्या असतील; परंतु त्यांचे पेटंट घेऊन ठेवावे एवढी दक्षता आपण घेतलेली नाही.

आपण पेटंट नोंदवण्यासारखे काहीच करत नाही, असे काही नाही. टाटा मोटर्सने नॅनो कार तयार केली तेव्हा त्या गाडीमध्ये अनेक नव्या गोष्टी केल्या. मात्र तोपर्यंत टाटा कंपनी पेटंटबाबतीत जागृत नव्हती. नॅनो कारच्या बाबतीत मात्र त्यांनी ही उदासीनता सोडली आणि नॅनो कार तयार करताना केलेल्या विविध संशोधनांचे 100 वर पेटंट घेतले.

पेटंटच्या बाबतीत जसा भारत, अमेरिका आणि अन्य देशांमध्ये फरक दिसतो तसा तो भौगोलिक निर्देशनातही दिसतो. गेल्या काही वर्षांमध्ये युरोपातील विविध देशांनी 42 हजारांवर भौगोलिक निर्देशने प्राप्त केली आहेत. पण भारत याहीबाबतीत पिछाडीवर आहे. गेल्या काही वर्षांत जिऑग्रॉफिकल इंडिकेशन किंवा भौगोलिक निर्देशन यासारख्या मार्गांनी अशा शेतीमालाचे मार्केटिंग करता येते, हे लक्षात यायला लागले आहे. मुळात 2004 पर्यंत अशा प्रकारचे निर्देशन केले जात नव्हते. 2004 साली ते सुरू झाले. पहिल्यांदा भारतातल्या दार्जिलिंग चहाने हे निर्देशन मिळविले. असे निर्देशन मिळविल्याने दार्जिलिंगचा चहा हा जगभरात दार्जिलिंग चहा या विशेष नावाने अधिकृतरीत्या ओळखला जातो.

उत्तम चहा पिणार्‍या चहांबाज लोकांना एका विशिष्ट चवीचा चहा हवा असतो. त्यांच्या चहाची पावडर बदलली की, त्यांना चालत नाही आणि ज्या चवीच्या पावडरची सवय झालेली असते, त्या पावडरचा चहा पिल्याशिवाय त्यांना चहा पिल्याचे समाधान मिळत नाही. अशा लोकांच्या या सवयीचा गैरफायदा घेऊन, काही लोक कोणतीही चहाची पावडर दार्जिलिंग चहा म्हणून विकण्याचा प्रयत्न करतात. ग्राहकांची फसवणूक होते आणि दार्जिलिंग चहा तयार करणार्‍यांचे नुकसान होते.

मात्र, दार्जिलिंग चहाला भौगोलिक निर्देशन मिळाले असल्यामुळे या नावाचा वापर करून अन्य कोणीही चहाची पावडर तयार करू शकणार नाही. परिणामी, दार्जिलिंग चहाचा फायदा होतो. ही गोष्ट अन्यही खाद्य पदार्थांना आणि हस्तकलेच्या वस्तूंना लागू आहे. अनेक खाद्य पदार्थांचे आगार असलेल्या भारतात मात्र याबाबत कमालीची उदासीनता आहे. भारतातील कर्नाटक हे राज्य भौगोलिक निर्देशने प्राप्त करण्याच्या बाबतीत बरेच आघाडीवर आहे. कर्नाटकातील मट्टीगुल्ला या वांग्याचे भौगोलिक निर्देशन 2016 मध्ये घेण्यात आले.

या वांग्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते चवीला खास आहे. त्याच पद्धतीने कर्नाटकाने म्हैसूर अगरबत्ती, म्हैसूर पाक, बंगळूर रोझ ओनियन हा कांदा, धारवाडीत पेढा, अ‍ॅप्पेमेडी हा आंबा इत्यादी अनेक कृषी उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तुंची भौगोलिक निर्देशने प्राप्त केली आहेत. आजवर भौगोलिक निर्देशन घेतलेल्या 250 पेक्षाही अधिक वस्तूंमध्ये महाराष्ट्रातील महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची चादर, सोलापूरचे टेरी टॉवेल्स, कोल्हापूरचा गूळ यांचा समावेश आहे. अर्थात पेटंट आणि भौगोलिक निर्देशन यामध्ये फरक आहे.

स्टार्टअप योजनेअंतर्गत अर्ज करणार्‍या युवकांची पेटंटची प्रकरणे महिन्याच्या आत निकाली काढण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना पुढील सुविधा तातडीने मिळू शकतील. गेल्या दहा वर्षांत 68 हजार पेटंटची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. पेटंटसाठी रांगेत वर्षानुवर्षे उभे राहावे लागणे म्हणजे एका अर्थाने देशातील तरुणांनी केलेल्या आविष्करांचा अवमान केल्यासारखे ठरेल. ही प्रमुख समस्या तातडीने सोडविली गेल्यास, तंत्रज्ञानाच्या आविष्करणात भारत आघाडी घेईल आणि बौद्धिक क्षेत्रात आघाडी घेणारा देशच महासत्ता बनू शकतो.

केवळ तंत्रज्ञानाच्या किंवा नवसंशोधनांच्या क्षेत्रातच नव्हे, तर डॉ. माशेलकरांनी हळदीच्या पेटंटसाठी दिलेल्या लढ्यातून प्रेरणा घेऊन आपल्या पारंपरिक ज्ञानाच्या संरक्षणासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. निरनिराळ्या वनस्पती, कंदमुळे यांचे औषधी गुणधर्म आयुर्वेद किंवा भारतीय वैद्यकशास्त्राला हजारो वर्षांपासूनच माहिती आहेत. या पारंपरिक ज्ञानावर अधिक संशोधन करणे आणि अभ्यास करणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news