राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मशाल (ज्योती) चे गोव्यात अनावरण; अमिताभ बच्चन यांचा थीम साँगला आवाज

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मशाल (ज्योती) चे गोव्यात अनावरण; अमिताभ बच्चन यांचा थीम साँगला आवाज
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यात पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत आहे. सरकारने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. भारताच्या अमृत काळात आणि गोवा मुक्तीच्या हीरकमहोत्सवी वर्षात आयोजित होणार्‍या या स्पर्धेचे आयोजन न भूतो न भविष्यति असे करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आज शुक्रवारी राजभवनावरील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या मशाल(ज्योत) तसेच थीम साँगचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सिंगल विंडो सिस्टीमच्या वेबसाइटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल पी.एस. श्रीधरण पिल्लई, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, क्रीडामंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री बोलताना म्‍हणाले, या स्पर्धेची तयारी सरकारने जोरदारपणे केली आहे. इतर राज्यापेक्षा गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही आगळी वेगळी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. गोवा मुक्तीनंतर पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. पुढील काळात गोव्याला या स्पर्धेचे यजमानपद केव्हा मिळेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे ही अपूर्व अशी संधी आम्हांला लाभली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी समस्त गोवेकरांची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, क्रीडा मशाल गोवाभर फिरेल तसेच ज्या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. त्या जागीही फिरणार आहे. त्याचसोबत इतर राज्यांमध्येही ती फिरणार आहे. गोव्याच्या क्रीडापटूना अशक्य ते शक्य करण्याची संधी या स्पर्धेतून लाभली असून त्याचा फायदा गोमंतकीय क्रीडापटूंनी घ्यावा आणि जास्तीत जास्त पदके प्राप्त करावीत, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना राज्यपाल म्‍हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्याचा अभिमान ठरणारी असून गोव्याला लाभलेली ही उत्तम संधी आहे. याचा फायदा प्रत्येक खेळाडूने घ्यावा. भारतातील गोवा एक सुंदर राज्य असून येथील क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देशाची आणि राजाची शान वाढवण्याची संधी खेळाडू सोबतच राजकीय नेते , राजकीय पक्ष आणि नागरिकांना मिळणार असल्याचे राज्यपाल म्हणाले.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले होते. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांना विनंती पत्र दिले होते. या दोन्ही गोष्टीमुळे बच्चन यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या थींम साँगला आपला आवाज दिल्याचे गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले. बच्चन यानी त्यासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही असे सांगून यापूर्वी स्पर्धेत 37 ते 38 क्रीडा प्रकार होते. यावेळी 43 झाले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा अपूर्व अशी ठरणार असल्याचे गावडे म्हणाले.

28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 8 हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असून 43 क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दर्शवणार आहेत. ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

-हेही  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news