राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राने ओलांडले पदकांचे दीडशतक!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राने ओलांडले पदकांचे दीडशतक!

पणजी, विवेक कुलकर्णी : महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करीत पदकांचे दीडशतक ओलांडले आहे. जलतरण, टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स, कुस्तीमधील पदकांच्या बळावर महाराष्ट्राने आतापर्यंत 60 सुवर्ण, 48 रौप्य आणि 53 कांस्यपदकांसह एकूण 161 पदके जिंकत पदकतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे.

सेनादल (37 सुवर्ण, 13 रौप्य, 13 कांस्य) दुसर्‍या आणि हरियाणा (31 सुवर्ण, 21 रौप्य, 33 कांस्य) तिसर्‍या स्थानावर आहेत. जलतरणात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकले. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रौप्य व एक कांस्यपदके अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. टेबल टेनिस क्रीडा प्रकारात दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले.

महाराष्ट्राने टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली. रोल बॉलमध्ये महाराष्ट्र महिला संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला, तर पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या यमुना लडकतने महिलांच्या 800 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news