‘सुगम्य भारत’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार

‘सुगम्य भारत’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार शनिवारी (दि.३) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला सुगम्य भारत अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सोहळ्यातून गौरविण्यात आले. यासह राज्यातील चार दिव्यांग व्यक्ती, एक संस्था आणि अकोला जिल्हा पर‍िषदेला सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 'जागतिक दिव्यांग दिना'चे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०२१-२०२२ चा राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले, प्रतिमा भौमिक, केंद्रीय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमातून वर्ष २०२१ साठी एकूण २५ राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्‍ये महाराष्ट्रातील तीन दिव्यांग आणि अकोला जिल्हा परिषदचा समावेश आहे. वर्ष २०२२ मध्ये एकूण २९ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्याला सुगम्य भारत अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल, एक दिव्यांग आणि एक गैरशासकीय संस्थेचा गौरव करण्यात आला.

'सुगम्य भारत अभियान'ची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट राज्य ठरले असून, हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. अभियानातंर्गत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या  शहरांतील १३७ इमारती सुगम्य करण्यात आलेल्या आहेत. याकरिता केंद्र शासनाकडून आतापर्यंत २१९७.३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यासह या अभियानातंर्गत २४ संकेतस्थळे सुगम्य करण्यात आली आहेत. राज्यातील २९ % परिवहन सेवेतील वाहतूक साधने विशेषत: बस सुगम्य करण्यात आलेल्या आहेत.या केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला गौरविण्यात आले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news