Nashik | आज श्रीराम, गरुड रथयात्रा; रथोत्सवाची २४७ वर्षांची परंपरा

पंचवटी : बुरड गल्लीतून काळाराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या रामरथाच्या दर्शनासाठी भाविकांनी अशी गर्दी केली होती. (छाया : हेमंत घोरपडे)
पंचवटी : बुरड गल्लीतून काळाराम मंदिराच्या दिशेने निघालेल्या रामरथाच्या दर्शनासाठी भाविकांनी अशी गर्दी केली होती. (छाया : हेमंत घोरपडे)

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखली जाणारी श्रीराम व गरुड रथयात्रा शुक्रवारी (दि.१९) निघणार आहे. यास २४७ वर्षांची परंपरा असून, १७७२ पासून हा रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. परंपरेनुसार सुशोभित रामरथ गुरुवारी (दि.१८) सायंकाळी काळाराम मंदिरापर्यंत दाखल झाला.

शुक्रवारी मंदिराच्या पूर्व दरवाजापासून दुपारी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. गरुडरथ मार्गक्रमण करून आल्यावर रामसेतू पुलाखाली कपूरथळा येथे भाविकांच्या दर्शनासाठी थांबतो. आणि रसपानानंतर गरुडरथ हा रामरथाच्या दिशेने वाटचाल करतो. तिथून मग दोन्ही रथ हे रामकुंडाकडे सरदार चौकमार्गे मार्गस्थ होतात. रामकुंडावर पोहोचल्यावर रथामधील देवांना बुवांच्या हस्ते अवभूत असे स्नान होते. त्यानंतर रामाच्या बहुमूर्तींना रामकुंडात नेऊन स्नान घातले जाते. पूजाआरती होऊन श्रीरामांच्या बहुमूर्ती आणि पादुका यांना रथामध्ये विराजमान करून पुढचा प्रवास सुरू होतो. नंतर दोन्ही रथ भगवान कपालेश्वरच्या समोरून मालवीय चौकाकडून, शनी चौकमार्गे, काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजामार्गे आणि तिथून पुढे चंद्रमौलेश्वर मंदिरापासून पुन्हा काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे येतात, अशी परंपरा आहे.

रामनवमीनंतर येणाऱ्या एकादशीला शहरातून रामरथ आणि गरूड रथ यांची रथयात्रा काढली जाते. त्यानुसार शुक्रवारी (दि.१९) एकादशीनिमित्त रथयात्रा काढली जाणार असून रथयात्रेत सहभागी होण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने गोदाकाठ परिसरात उपस्थित राहात असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने रथ ज्या मार्गाने मार्गस्थ होईल, त्या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाहतुक मार्गात बदल
श्रीराम रथ आणि गरूड रथ मिरवणूकीसाठी वाहतूक विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. श्रीराम रथ नदी ओलांडत नसल्याने तो गाडगे महाराज पुलाजवळ गरुड रथ येईपर्यंत थांबतो. गरुड रथ मेनरोडमार्गे गाडगे महाराज पुलाजवळ आल्यावर गरुड रथ पुढे आणि रामरथ मागे अशी रथयात्रा सुरु होते. रथयात्रा मार्गांवर वाहतूक बंद करण्यात आल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीराम रथ मिरवणूक काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाज्यापासून नागचौक-चरण पादुका चौक-लक्ष्मण झुला पूल-काट्यामारूती – गणेशवाडी रोड- आयुर्वेदिक रुग्णालय- गौरी पटांगण-म्हसोबा पटांगण- कपालेश्वर मंदिर- परशुराम पुरीया रस्त्याने मालवीय चौक-शनीचौक-आखाडा तालीम-काळाराम मंदिर उत्तर दरवाजा ते काळाराम मंदिर पूर्व दरवाजा अशी निघणार आहे. श्री गरूडरथ मिरवणूक श्रीरामरथाबरोबर पुढे मार्गस्थ होते. यामुळे शुक्रवारी (दि.१९) दुपारी दोनपासून मिरवणूक संपेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आलेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news