Nashik Summer Hit : काळजी घ्या! तापमानात सरासरी दोन अंशांची वाढ

Nashik Summer Hit : काळजी घ्या! तापमानात सरासरी दोन अंशांची वाढ
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाशिवरात्रीनंतर जिल्ह्यातील उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे. दुपारी १२ ते चार या वेळेत तीव्र झळा जाणवत असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे.

गेल्या आठवड्यात थंडीचा अनुभव घेणाऱ्या जिल्हावासीयांना आता कडाक्याच्या उन्हाला सामाेरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवड्यात नाशिकचा पारा ३५ अंशांपलीकडे जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यासोबत सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागत आहे. दुपारी उन्हाचा जोर अधिक असल्याने रस्ते निर्मनुष्य होत आहे. तर उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी पंखे, एसी, कूलरची मदत घेतली जात आहे. दुसरीकडे कामानिमित्त घराबाहेर पडणारे चाकरमानी उन्हापासून बचावासाठी टोप्या, तर महिलावर्ग स्कार्फ व सनकोटची खरेदी करण्याला पसंती देत आहेत. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा झंझावात कमी झाल्याने येत्या काळात हवामान काेरडेठाक राहील. अशावेळी उन्हाचा कडाका अधिक वाढणार असल्याने सर्वसामान्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचना
काय करावे :-
-पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
-घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
-दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
-सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
-उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
-हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
-प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
-उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
-शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
-अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
-गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
-घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
-पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
-कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
-सूर्यप्रकाशाचा संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
-पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास अधूनमधून विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
-गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

नाशिक : उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नेहमी वर्दळीने गजबजणारा रस्ता शनिवारी असा निर्मनुष्य झाला होता. (छाया : हेमंत घोरपडे)
नाशिक : उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील नेहमी वर्दळीने गजबजणारा रस्ता शनिवारी असा निर्मनुष्य झाला होता. (छाया : हेमंत घोरपडे)

काय करू नये :-
-उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
-दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
-दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
-उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
-लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
-गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
-बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
-उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news