मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; येथून जवळच असलेल्या ऐतिहासिक अनकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग आढळला असून, शेतात नांगरणी करताना एक मोठे भगदाड पडून हा भुयारी मार्ग सापडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला आणि त्याने मोबाइलवरून माहिती दिल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेची माहिती पुरातत्त्व विभागाला कळविल्याचे तलाठी यांनी सांगितले.
हा भुयारी मार्ग कोठून कुठपर्यंत आहे, याचा उलगडा पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर स्पष्ट होणार आहे. तर भुयारी मार्गाबाबत लोकांची उत्स्कुता शिगेला पोहोचली आहे. युवराज धिवर हा शेतकरी शेतात नांगरणी करताना जमिनीत भगदाड पडून एक मोठा खोल खड्डा झाला. तिकडे किल्ल्याच्या पायथ्याशी भुयार सापडल्याचे वृत्त वाऱ्यासारखे अनकाई गावासह इतर ठिकाणी पसरल्यानंतर लोकांनी भुयारी मार्ग पाहण्यासाठी गर्दी केली. घटनास्थळी आल्यानंतर तलाठी यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. शनिवारी (दि.30) अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत.
किल्ल्याच्या काही भागांत अनेक भुयारी मार्ग असल्याचे जुनेजाणते लोक सांगतात. या अगोदरदेखील काही मार्ग आढळल्याचे सांगितले जात आहे. अनकाई किल्ला हा ऐतिहासिक असून, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्या दोन स्तरांवर पसरलेल्या आहेत. खालच्या स्तरावर दोन गुहा आहेत. त्यापैकी एकही मूर्ती नाही. वरच्या स्तरावर पाच गुहा आहेत, ज्यात महावीर मूर्ती असून मुख्य गुहेत यक्ष, इंद्राणी, कमळ आणि भगवान महावीर यांचे नक्षीकाम आहे.
असा आहे किल्ल्याचा इतिहास
अनकाई सुमारे एक हजार वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादवाने बांधला होता. शाहजहानचा सेनापती खानच्या नेतृत्वाखाली मुघलांनी 1665 मध्ये किल्ला सेनापतीला लाच देऊन हा किल्ला ताब्यात घेतला होता. या किल्ल्याचा उल्लेख सुरत आणि औरंगाबाद शहरांमधील प्रवासात एक टप्पा म्हणून करण्यात आलेला आहे. अनकाईला अखेर निजामाने मुघलांकडून ताब्यात घेतले. त्यानंतर 1752 मध्ये भालकीच्या तहानंतर हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यात आला. किल्ल्यावर जैन, बौद्ध लेणी सोबत भगवान रामाचे मंदिर आणि मुस्लीम बांधवांची एक दर्गाहसुद्धा आहे. त्यामुळे येथे सर्वधर्मीय पर्यटकांची नेहमी मोठी गर्दी असते.
हेही वाचा :