Nashik News : सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

Nashik News : सधन निफाडमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी संपवला जीवनप्रवास

 जगाचा पाेशिंदा असलेल्या बळीराजाकरिता शासन स्तरावर विविध योजना असतानाही शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबलेल्या नाहीत. नाशिक जिल्ह्यात २०१४ ते आजपर्यंत ५८४ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी जीवनप्रवास संपविला आहे. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया अशी ओळख लाभलेल्या निफाड तालुक्यात सर्वाधिक १०९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या राज्यासाठी ही चिंताजनक बाब आहे.

पाचवीला पूजलेला दुष्काळ, अवकाळी तसेच गारपिटीचा मारा तसेच बॅंकांचा वाढता कर्जाचा बोजा अशा विविध कारणांमुळे मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील शेतकरी भरडून निघाला आहे. त्यातच जीवापाड जपलेल्या शेतीपिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादनाचा खर्चही भागत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतो आहे. या सर्व परिस्थितीत आशेचा किरण सापडत नसल्याने नाईलाजास्तव शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये ५८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्वाधिक सधन तालुका, अशी बिरुदावली मिरवणाऱ्या निफाडमध्ये १०९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अवर्षणग्रस्त मालेगाव आणि बागलाणमध्ये अनुक्रमे ९८ व ९२ आत्महत्या झाल्या आहेत. नाशिक तालुक्यात २१ घटनांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत आदिवासीबहुल पेठ आणि सुरगाणा तालुक्यात सुदैवाने नऊ वर्षांमध्ये प्रत्येकी दोन आत्महत्यांच्या घटनांची नोंद प्रशासनाच्या लेखी झाली आहे. दरम्यान, निवडणुका आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांच्या पुळका येतो. तर एरवीदेखील सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण केले जाते. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या मूळ समस्या कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणतानाच त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असल्यास सर्वप्रथम शासकीय मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.

आदिवासीबहुल तालुक्यांत घटना

जिल्ह्यातील पेठ व सुरगाणा या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सुदैवाने कमी आहेत. मात्र, त्या व्यतिरिक्त अन्य आदिवासीबहुल तालुक्यांवर नजर टाकल्यास दिंडोरीमध्ये ५९ आत्महत्यांची नोंद नऊ वर्षांत झाली. कळवणला १९, त्र्यंबकेश्वरला १७ तसेच इगतपुरीत आठ घटनांची नोंद शासन दरबारी आहे.

कुटुंबांना 'उभारी'

नाशिक विभागात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी विभागीय महसूल आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली उभारी प्रकल्प राबविला जात आहे. त्या अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना व समाजातील शेवटच्या शेतकऱ्यांना अधिकाधिक शासकीय योजनांचा लाभ पोहोचविला जात आहे. त्यात शासनाला यश येत आहे. २०२० मध्ये जिल्ह्यात ४४ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. तर २०२१ व २०२२ मध्ये अनुक्रमे २३ व १० शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. चालूवर्षी आतापर्यंत १२ शेतकरी आत्महत्यांची नोंद प्रशासन दरबारी झाली आहे.

वर्षसंख्या
201442
201585
201687
2017104
2018108
201969
202044
202123
202210
202312

एकुण-584

२०१४ ते आजपर्यंत आत्महत्या

नाशिक २१, बागलाण 92, चांदवड ३८, सिन्नर ३८, देवळा १५, दिंडोरी ५९, इगतपुरी ८, कळवण १९, मालेगाव ९८, नांदगाव ४५, निफाड १०९, त्र्यंबकेश्वर १७, येवला २१, पेठ २, सुरगाणा-2

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news