नाशिक लोकसभा मतदारसंघ : राजाभाऊ वाजे यांनी पिंजून काढली 250 गावे

नाशिक : लोकसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे.
नाशिक : लोकसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. तीन प्रमुख पक्षांसह अपक्ष अशी बहुरंगी आणि रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र आहे. आता प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा अवधी उरला असल्याने संपूर्ण मतदारसंघात उमेदवारांच्या दौऱ्यांनी धुरळा उडाला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत उमेदवारीचा घोळ न घालता महाविकास आघाडीने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे वाजे यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला असून, जवळपास 26 दिवसांमध्ये त्यांनी दररोज 14 तास प्रचार करीत 250 गावे पिंजून काढली आहेत.

महायुतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर उमेदवारीचा घोळ संपला. जवळपास महिनाभर महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्वितचर्वण सुरू होते. अखेर शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी लागलीच अर्ज दाखल केला. महायुतीच्या नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी करीत शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी आर्जव केले. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिलेले असून, ते महायुतीच्या उमेदवाराची डोकेदुखी ठरतील, अशी चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीनेदेखील करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केलेली असल्याने यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी आणि रंगतदार लढत होणार असल्याचे दिसते.

तथापि, लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकहाती विजय मिळविणाऱ्या गोडसे यांच्यासमोर यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आव्हान निर्माण केले असल्याचे दिसून येते. महविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना 27 मार्च रोजी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाजे यांनी 'मातोश्री'वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवस नाशिक शहरासह मतदारसंघातील मान्यवर मंडळींच्या भेटीगाठी घेतल्या. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक विलास शिंदे, डी. जे. सूर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात प्रचाराचे नियोजन आखले.

वाजे यांनी साधारणपणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून नाशिक शहरातील काही भाग तसेच इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात प्रचाराचा झंझावात निर्माण केला. गावोगावी भेटी देऊन मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. विकासाचे व्हिजन मांडले. गेल्या 26 दिवसांमध्ये त्यांनी दररोज सकाळी 7.30 ते रात्री 10 पर्यंत रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार केला. रात्री दहानंतर वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला. त्यामुळे नाशिक लोकसभेच्या 455 पैकी अडीचशे गावांमध्ये ते पोहोचले आहेत. आता त्यांनी नाशिक तालुक्यात लक्ष केंद्रित केले असल्याचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दीप्ती वाजे यांच्या सिन्नर तालुक्यात भेटीगाठी
सिन्नर तालु्नयातील गावांमध्ये राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गटनिहाय दौरे चालवले आहेत. नायगाव गटापासून त्यांनी मतदारांच्या भेटीगाठींना सुरुवात केली. ठाणगाव गटाचाही त्यांचा दौरा झाला आहे. त्यांच्या या भेटीगाठींनादेखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

स्वच्छ प्रतिमा, पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिक आणि विकासाचे व्हिजन असलेला कार्यकर्ता म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. विकासाचा अनुशेष भरून काढण्याची क्षमता त्यांच्यात आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. नियोजनबद्ध प्रचारतंत्र अवलंबून राजाभाऊंच्या विजयाची खुणगाठ मनाशी बांधली आहे. – सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news