नाशिक : भूजल साठ्यात पाच वर्षांत नीचांकी पातळी

नाशिक : भूजल साठ्यात पाच वर्षांत नीचांकी पातळी

मोसमात पावसाने दिलेला झटका, वाढते तापमान आणि भूजलातून होत असलेला बेसुमार उपसा यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. नुकताच जिल्ह्याच्या भूजल पातळीचा जानेवारीअखेरचा भूजल सर्वेक्षण अहवाल विकास यंत्रणा (GSDA-Groundwater Surveys and Development Agency) विभागामार्फत प्रसिद्ध झाला असून, गेल्या पाच वर्षांत यंदा भूजल साठा सर्वांत नीचांकी स्तरावर गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली होती. परतीचा पाऊस झाला, मात्र त्यामु‌ळे भूजल पातळीत (Groundwater level) फारशी वाढ झाली नाही. तसेच सातत्याने पाण्यासाठी उपसा होत गेला. जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने GSDA-Groundwater Surveys and Development Agency) जिल्ह्यातील एकूण १८५ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले. निरीक्षणातून भूजल पातळी अहवाल जाहीर करण्यात आला असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी सर्वच्या सर्व १५ तालुक्यांतील भूजल पातळीत जानेवारीअखेरीस मोठी घट झाली असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होणार आहेत. सध्या जिल्ह्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून यात वाढ होणार आहे. (Groundwater surveys)

– १८५ विहिरींचे निरीक्षण
– ५ वर्षांत भूजल साठा सर्वात नीचांकी
– १० तालुक्यांत ५ मीटरहून खोल पाणी
– बागलाण, चांदवड, देवळा, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, सिन्नर आणि येवला यांचा समावेश

टंचाई आराखडा सादर
यंदा अनेक तालुक्यांत पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला. त्याबरोबरच आता झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामालाही फटका बसला. याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांसह इतर तालुक्यांना बसणार असून, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन हजार १६२ गावे तसेच वाड्या, वस्त्या यांना पाणीपुरवठा करण्यासाठी डिसेंबर महिन्यात १८ कोटी २२ लाखांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे.

तालुका : भूजल पातळी (मी.) (Groundwater level)
बागलाण : ८.३३
चांदवड : ७.५५
देवळा : ६.०७
दिंडोरी : ४.९६
इगतपुरी : ३.१६
कळवण : ७.९०
मालेगाव : ७.७१
नांदगाव : ६.२०
नाशिक : ५.१६
निफाड : ५.९७
पेठ : ३.८८
सिन्नर : ५.४७
सुरगाणा : ४.२४
त्र्यंबकेश्वर : ३.०१
येवला : ५.८१

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news