नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेपाठोपाठ भाजपने राष्ट्रवादीलाही सुरूंग लावल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू करताना भाजपला धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी बंड पुकारत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरच दावा ठोकला. निवडणूक आयोगानेही अजित पवार यांना पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला आहे. पवार यांनी भाजपसमवेत राज्याच्या सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रिपद घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नव्या पक्षाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट' असे नाव दिले आहे. राज्यभर दौरे करत पवार यांनी पक्षबांधणी सुरू केली आहे. राज्यभर मेळावे, बैठकांचे आयोजन केले जात आहे. ते बुधवारी (दि. १३) नाशिक दौऱ्यावर आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत त्यांनी सहभागी होत महाविकास आघाडी एकसंध असल्याचा संदेश दिला. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात जोरात उतरण्याची तयारी शरद पवार यांनी सुरू केली आहे. भाजपने राष्ट्रवादीत फूट पाडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले लक्ष भाजपकडे वळवले आहे. शरद पवार यांच्याकडून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
हरिश्चंद्र चव्हाण भाजपवर नाराज
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे गेल्या काही महिन्यांपासून भाजपपासून दूर आहेत. भाजपच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांसमोर चव्हाण मैदानात उतरण्याची शक्यता आहे. चव्हाण राष्ट्रवादीत गेले, तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम राहील. – हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार, दिंडोरी.