कांदा निर्यात शुल्काविरोधात आज वणी येथे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कांदा दर वाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ शेतकरी एकवटले व त्यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. आक्रमक शेतक-यांनी सुमारे दिडतास रस्त्यावर ठिय्या मांडत निर्णयाची होळी केली.
वणी येथील विर बिरसा मुंडा चौकात शेतकरी संघटना व सर्व पक्षाच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले. कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अशी मागणी शेतक-यांनी यावेळी केली. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आंदोलनाला जाहिर पाठींबा देण्यात आला. वणी पोलीस ठाण्याचे सपोनि. निलेश बोडखे यांना निवेदन देण्यात आले. सुमारे एक तास वाहतुक थांबली होती.
वणी येथील आंदोलन दिंडोरी कळवण, देवळा, सुरगाणा, तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी, बाजार समितीचे अध्यक्ष, संचालक, व्यापारी सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, गणपत बाबा पाटील, विलास कड, गंगाधर निखाडे, संतोष रेहरे, बाळासाहेब घडवजे, प्रकाश कड, धना शिरसाठ, संजय बच्छाव आदी आंदोलनात सहभागी होते.