सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी स्थितीचा (Nashik Drought) पाहणी दौरा सुरु आहे. आज सिन्नर तालुक्यातील भोकणी, खोपडी, खंबाळे भागात पथकाने पाहणी केली. यावेळी, किती वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेता, वार्षिक उत्पन्न किती मिळते, त्याचबरोबर पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली का अशी विचारपूस पथकातील अधिकाऱ्यांनी केली.
त्यावर शेतकऱ्यांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून सोयाबीनचे पीक घेतो. एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते. मात्र यंदा आरंभी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आणि पेरलेले उगवलेच नाही तसेच जे उगवले तेही करपून गेले, अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. याच भागात रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पथकाने पाहणी केली तसेच पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात रोजगार हमीतून कामांची किती प्रमाणात मागणी आहे याबाबत विचारणा केली.
रोजगार हमी अंतर्गत काही गावांतून रोजगाराची मागणी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. खोपडी, भोकणी आणि खंबाळे येथे पथकाने करपलेले पिके विहिरींच्या पाण्याची स्थिती याची पाहणी केली. सोयाबीनच्या शेतात पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा पथकाने जाणून घेतल्या. एका ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट शेतकऱ्यांशी चर्चा करून दुष्काळी स्थितीचा पथकाने आढावा घेतला.