नाशिक : जिल्ह्यातील पाणी कपातीवर आज निर्णय

नाशिक : जिल्ह्यातील पाणी कपातीवर आज निर्णय
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फेब्रुवारीच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत असून सध्या केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच १७० टँकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईचा दाह लक्षात घेता पालकमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.२३) आढावा बैठक बोलविली आहे. बैठकीत पाणी कपातीबाबत काही निर्णय होणार का याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने फेब्रुवारी महिन्यात नाशिकला दुष्काळाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे. ग्रामीण भागात नैसर्गिक जलस्त्रोत आटल्याने जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. आजमितीस जिल्ह्यातील १७४ गावे तसेच ३८५ वाड्यांना एकुण १७० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसभरात टँकरच्या ३५९ फेऱ्या होत आहेत. दुसरीकडे उन्हाच्या तीव्र झळांसोबत धरणांच्या जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. प्रमुख २४ प्रकल्पात केवळ २९ हजार ६५ दलघफु साठा उपलब्ध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ ६१ टक्के साठा शिल्लक आहे. अन्य मोठ्या प्रकल्पांपैकी दारणामध्ये ४३ टक्के, पालखेडला २६ टक्के, गिरणामध्ये ३५, तर मणिकपुंज धरणात अवघा २१ टक्के साठा उपलब्ध आहे.

जिल्ह्यात दिवसागणिक पाण्याचे दुर्भिक्ष अधिक गडद होत चालले आहे. शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल अशा पद्धतीने धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे. या सर्व पार्श्वभुमीवर पालकमंत्री भुसे यांनी टंचाईच्या आढाव्यासंदर्भात बैठक बोलविली आहे. या बैठकीत पाणी उपलब्धतेसह चाराटंचाई व चोरट्या मार्गाने परजिल्ह्यात होणारी वाहतुकीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, सदर बैठकीनंतर भुसे हे पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेणार आहेत.

भुसे यांची भूमिका महत्वाची जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यात दिवसागणिक झपाट्याने घसरण होत आहे. तसेच ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत ही वाढ होत आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (दि.२१) टंचाईचा आढावा घेत १५ ते २० टक्के पाणीकपातीचे संकेत दिले होते. त्यानंतर पालकमंत्री भुसे हे टंचाईची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत. आगामी लाेकसभा निवडणूक व भविष्यातील पाण्याचे दुर्भिक्ष अशा दुहेरी कात्रीत अडकल्याने पाणी कपातीबद्दल भुसे काय भूमिका घेतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news