नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नोकरीवर असताना मालकाची नजर चुकवून कारमधून तीन लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या संशयिताला भद्रकाली पोलिसांनी पकडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितास हिंगोली येथून पकडले. त्याच्याकडून एक लाख ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गणपत हाडपे (रा. गंगापूर रोड) हे दि. २३ जानेवारीला कामानिमित्त जिल्हा परिषदेसमोरील परिसरात आले होते. त्यावेळी त्यांचा कारचालक प्रशांत गवळी (रा. वाशीम) याने हाडपे कारमध्ये नसल्याची संधी साधून कारमधून तीन लाख रुपये घेऊन पळून गेला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताचा संपर्क क्रमांक किंवा इतर पुरावा नसल्याने पोलिसांनी सोशल मीडियाच्या मदतीने त्याचा शोध घेतला.
तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संशयित जालना जिल्ह्यात असल्याचे समजले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नरेंद्र जाधव, संदीप आहेर हे जालना येथे गेले होते. मात्र प्रशांत तेथून फरार झाला व तो हिंगोली जिल्ह्यातील सिरसम तालुक्यात लपला होता. त्यानुसार पथकाने पाठलाग करीत प्रशांतला पकडले. त्याच्याकडून एक लाख ७० हजार रुपयांची रोकड व १२ हजार ५०० रुपयांचा मोबाइल जप्त केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश शिंदे करीत आहेत.
हेही वाचा :