नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम चौफुलीवर वळण घेत पुढे जाणाऱ्या घंटागाडीचा धक्का लागून मागच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार प्राध्यापिकेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, के. के. वाघ शिक्षण संस्थेत प्राध्यापिका असलेल्या विनिता रामचंद्र कुयटे (वय २७, रा. केशवलीला पार्क, मखमलाबाद रोड, पंचवटी) या महाविद्यालयात जात असताना शनिवारी (दि.२४) सकाळी पावणेआठच्या दरम्यान ही घटना घडली. विनिता कुयटे या नेहमीप्रमाणे शनिवारी (दि. २४) सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवरून जात असताना वळण घेऊन पुढे जाणाऱ्या घंटागाडीची (एमएच १५, एचएच ८४६४) त्यांना धडक बसली. या धडकेत विनिता रस्त्यावर पडल्या आणि घंटागाडीच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत.
हेल्मेट असतानाही मृत्यू
अपघातात ठार झालेल्या विनिता कुयटे अविवाहित असून, त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. विशेष बाब म्हणजे विनिता यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले असतानाही या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.