![नाशिक क्राईम : पेठ रोडवर एकावर प्राणघातक हल्ला](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F10%2Fcrime-search.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : म्हसरूळ लिंक रोडवर चौघांनी मिळून एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.२५) सकाळी घडली. या हल्ल्यात सौरभ विठ्ठल कदम (२०, रा. पेठ रोड), सूरज चारोस्कर व दत्तू शेलार हे जखमी झाले आहेत. सौरभच्या फिर्यादीनुसार संशयित सोनू धात्रक, सागर येलमामे, रोहित पगारे, पप्पू रणमळे यांनी रविवारी सकाळी कुरापत काढून मारहाण केली. हत्यार व लाकडी दांडके वापरून संशयितांनी प्राणघातक हल्ला केल्याने तिघे जखमी झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : पादचारी महिलेकडील सोन्याची पोत आणि मोबाइल ओरबाडून चोरटा पसार झाल्याची घटना वडाळा-पाथर्डी रोडवरील गुरू गोविंद सिंग काॅलेजसमोर घडली. सुनंदा अण्णासाहेब डोखे (रा. सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी (दि.२६) पायी जात असताना चोरट्याने १ लाख १९ हजार रुपयांची दागिने व मोबाइल हिसकावून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.
नाशिक : नाशिकरोडच्या दिशेने जात असताना गांधी शोरूमजवळ झालेल्या अपघातात नवनीत मेसो चंद्रमोरे (५१, रा. बालाजीनगर, नाशिकरोड) यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.१८) सायंकाळी चारच्या सुमारास झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.