नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिटीलिंक अर्थात महापालिकेच्या परिवहन सेवेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता १६३ कोटींचे अंदाजपत्रक बुधवारी (दि.२१) नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. आगामी वर्षात सिटीलिंकला प्रवासी तिकीटांसह विविध मार्गाने ८५ कोटींचे उत्पन्न मिळणार असले तरी, खर्चाच्या तुलनेत ७८ कोटींची तूट येणार आहे. दरम्यान, ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात ८०.७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकाचे आयुक्त तथा प्रशासक व नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. सिटीलिंकचे अंदाजपत्रक यावेळी सादर करण्यात आले. सिटीलिंकच्या माध्यमातून शहरात २०० सीएनजी, तर ५० डिझेल अशा एकूण २५० बसेस चालविल्या जातात. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर दोन खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून या बसेसचे संचालन केले जाते. याबदल्यात ऑपरेटर्सना प्रतिकिलोमीटर दराने शुल्क अदा केले जाते. तिकीट वसुलीसाठी स्वतंत्रपणे दोन वाहक पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत. तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न सिटीलिंकच्या महसुलाचे प्रमुख स्त्रोत आहेत. याशिवाय सिटीलिंकच्या बसेस, बसथांब्यांवरील जाहिराती तसेच तिकिटावरील जाहिरातींच्या माध्यमातून सिटीलिंकला उत्पन्न मिळते. सिटीलिंकच्या माध्यमातून विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली जाते. सिटीलिंककरिता ऑपरेटर तसेच वाहक पुरवठादाराखेरीज कार्यालयीन कामासाठी स्वतंत्र कर्मचारी पुरवठादार ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींसाठी सिटीलिंकच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, एसटीचे विभाग नियंत्रक अरुण सिया, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रतिभा मोरे, सिटीलिंकच्या मुख्य लेखापाल सुरेखा जाधव, मनपाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट आदी उपस्थित होते.
सनदी लेखापालाची नियुक्ती
सिटीलिंकच्या लेखापरीक्षणासाठी निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या पंकज कुलकर्णी ॲण्ड असोसिएट्स् या सनदी लेखापालाच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला सिटीलिंकच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी नुकतेच नियुक्त झालेल्या दत्तात्रय पाथरूट यांची सिटीलिंकच्या संचालकपदावरील नियुक्तीसही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.