नाशिक; पुढारी ऑनलाईन : मुलीला जादुटोणा झाल्याचे सांगत सलग दोन वर्षांपेक्षा अधिक काळ भोंदूबाबा व त्याच्या भावाने पीडित आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील येवला येथे उघडकीस आली आहे.
याप्रकरणात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळल्याबाबतचा गुन्हा दाखला झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील एका तरुणीचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या आईने अंधश्रद्धेतून अजीज अब्दुल बाबा याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. आपल्याला हा बाबा अडचणीतून सोडवेल अशी आशा महिलेला होती.
मात्र या बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असे सांगत आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तसेच वेळोवेळी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ काढून आई व इतर दोन मुलींवर सातत्याने अत्याचार केले. संशयित आरोपी सुफी अजीज अब्दुल बाबा व जब्बार शेख या दोघांनी तब्बल दोन वर्षे ४ महिने वेळोवेळी आई व त्याच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत पैशाची मागणी देखील केली. याप्रकरणी येवला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.