नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
दिव्य नाभिक सामाजिक संस्थेने कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान संस्थेच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनिल वैद्य यांची तर अरुण वारुळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एप्रिल २०२४ पासून कटींग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
संस्थेच्या नूतन कार्यकारिणीच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली. यात सचिवपदी महेंद्र अहिरराव, खजिनदारपदी सुनील जगताप तर सदस्यपदी प्रवीण सोनवणे, हेमंत हिरे, कार्तिक चित्ते यांची निवड करण्यात आली. सभेत आगामी वर्षासाठी नियोजन करण्यात आले. सन २०१९ पासून कटिंग तसेच दाढी यांची दरवाढ करण्यात आलेली नव्हती. एप्रिल २०२४ पासून नवीन दरवाढ करावी असा सर्व सभासदांनी प्रस्ताव मांडत तो सर्वानुमते मंजुर करण्यात आला. कटिंग दाढीचा दर २०१९ पासून १५० रुपये होता. त्यात ३० रुपये वाढ करून १८० रुपये करण्यात आला. ही दरवाढ पुढील तीन वर्षे लागू राहणार आहे. नागरिकांनी या दरवाढीसाठी सलून दुकानदारांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सलूनसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतींत झालेली वाढ, वीजबिल आणि दुकानासाठी लागणारे भाडे, पाल्यांच्या शैक्षणिक खर्चात झालेली वाढ आणि सध्याची महागाई लक्षात घेत दरवाढ करण्यात आली आहे. -अनिल वैद्य, अध्यक्ष