मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील चिखलओहोळ गावाच्या हद्दीत ग्रामपंचायतीची बोगस परवानगी घेऊन प्लास्टिक गिट्टी कारखान्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील काही तरुण या कारखान्यांमध्ये गेले असता, त्या ठिकाणी सरपंचांनी सही केलेले कोरे लेटरहेड शिक्क्यासह मिळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अनिल सूर्यवंशी यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडेदेखील निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.
मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गिट्टी कारखाने आहेत. यासंदर्भात हरित लवादाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर हरित लवादाने हे कारखाने बंद किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील अनेक प्लास्टिक गिट्टी कारखाने चिखलओहोळ, दसाणे परिसरात स्थलांतारीत होत आहेत. हे कारखाने सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. असे असताना शहराजवळील चिखलओहोळ ग्रामपंचायतीने गिट्टी कारखान्यांना ना हरकत दाखला न देण्याचा ठराव ग्रामसभेत करून घेतला आहे. असे असतानाही ग्रामपंचायत हद्दीत अंदाजे ३०० च्या आसपास कारखाने सुरू असून, यात अनेक कारखाने सुरू तर काहींची कामे सुरू आहेत. यापैकी अनेकांनी परवानगी वा ना हरकत दाखला न घेता कामे सुरू केली आहेत. अशाच एका कामावर गावातील अनिल सूर्यवंशींसह काही तरुण गेले असता, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सही शिक्क्यानिशी कोरे बोगस लेटरहेड व ना हरकत दाखले मिळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
यावेळी सरपंचांची या बोगस लेटरहेडवर बोगस सही असल्याचे आढळले आहे. यासंदर्भात सूर्यवंशी यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे पंचायत समितीस्तरावरून चौकशी करण्यात यावी अशी तसेच तालुका पोलिस ठाण्यातदेखील तक्रार देत चौकशीची मागणी केली आहे. पंचायत समिती अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत धाव घेत माहिती जाणून घेतली. त्यानंतर संशयास्पद असलेले संपूर्ण दफ्तर ताब्यात घेतले आहे.
भावना जाणून घेतल्या
चिखलओहोळ प्रकरणासंदर्भात तक्रार आली. त्यानुसार पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यांची समिती या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
शहरातील प्लास्टिक गिट्टी कारखाने चिखलओहोळ, दसाणे शिवारात स्थलांतरित होत आहेत. या कारखान्यांमुळे या भागातील शेती धोक्यात येऊन प्रदूषण वाढणार आहे. हे कारखाने सुरू होऊ नये म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयत्न करावेत. – निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते.
एका गिट्टी कारखान्यात ग्रामपंचायतीचे कोरे लेटरहेड शिक्क्यासह मिळून आले. ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिलेला नसताना देखील वीज वितरण कंपनीचे रोहित्र या ठिकाणी उभे आहेत. या बोगस ना हरकत दाखल्यांची चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल करावेत. – अनिल सूर्यवंशी, ग्रामस्थ, चिखलओहोळ.